भास्कर राऊत, मारेगाव: विविध धाडीत जप्त केलेली दारू गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी नष्ट करून त्याची निर्गती करण्यात आली. ही दारू सुमारे 2 लाखांची होती. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या वर्षात मारेगाव पोलीसांनी पोलीस स्टेशन अंतर्गत 51 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत मोठया प्रमाणावर दारूसाठा हस्तगत केला होता. विशेष म्हणजे रिकाम्या झालेल्या दारुच्या बॉटलमधूनही दीड हजार रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.
2020 या वर्षभरात 1000 रुपयांच्या वरील किंमतीचा देशी व विदेशी दारूचा एकूण 2 लाख 3 हजार 475 रुपयांच्या मुद्देमाल मारेगाव पोलिसांनी जप्त केला होता. न्यायालयाच्या परवानगीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक व दोन प्रतिष्ठीत पंच यांच्या समक्ष या देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल नाश करून निर्गती करण्यात आला. रिकाम्या झालेल्या दारूच्या बॉटलांचा लिलाव करून प्राप्त झालेली रक्कम एक हजार पाचशे दहा रुपये राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे मार्फत शासनाकडे जमा करण्यात आली.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ, अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जगदीश मंडलवार, तसेच पोलीस स्टेशनचे हेड मोहरर, पोलीस हवालदार रवींद्र गुप्ता तसेच पोलीस स्टेशनचे इतर सहकारी यांनी पार पाडली.
हे देखील वाचा: