वणीमध्ये सेनेची मुहुर्तमेढ करणारे शिंदे गटाला देणार उभारी ?
गाजावाज्यात दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचे वणीत नियोजन... काय होते आनंद दिघे आणि विनोद मोहितकर यांचे नाते?
निकेश जिलठे, वणी: अवघ्या राज्याचं लक्ष लागलेला शिवसेनेचा दसरा मेळावा अखेर मुंबईत पार पडला. यंदा शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट असे दोन स्वतंत्र मेळावे झाल्याने संपूर्ण राज्यात अधिकाधिक लोक घेऊन जाण्याची स्पर्धा सुरू झाली होती. वणी विधानसभा क्षेत्रातून शिंदे गटाने तब्बल 35 ते 40 बसेस पाठवून एकच खळबळ उडवून दिली. याच निमित्ताने वणीत शिवसेनेची मुहुर्तमेढ करणारे व शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख विनोद मोहितकर हे राजकारणात धडाक्यात पुनरागमन करीत असल्याचे दिसून आले. त्यासाठी त्यांनी जुने शिवसैनिकांना सोबत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा क्षेत्रात सेनेची मुहुर्तमेढ करणारे मोहितकर शिंदे गटाला उभारी देणार का? याविषयी आता स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
शिंदे गटाची साथ धरलेले अधिकाधिक नेते हे मुळचे शिवसैनिक आहेत. विनोद मोहितकर हे माजी जिल्हा प्रमुख, मनिष सुरावार हे माजी विद्यार्थी सेना पदाधिकारी, राजू तुराणकर हे सेनेचे माजी शहर प्रमुख होते. मा. जि. प. सदस्य टिकाराम खाडे, माजी पंचायत समिती सभापती सुधाकर गोरे, मारेगाव येथील गजानन किन्हेकर, विजू मेश्राम झरी तालुक्यातील किशोर नांदेकर इ. नेते देखील शिवसेनेशी संबंधीत होते. विशेष म्हणजे यातील अधिकाधिक नेते हे शिंदे गट स्थापन झाल्यावर अचानक सक्रीय झाले आहे.
सर्वप्रथम वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेतर्फे दे.मा. ठावरी यांना शिवसेनेचे तिकीट देण्यात आले. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेची कार्यकारी जाहीर झाली. त्यावेळी विनोद मोहितकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते यवतमाळ जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर 1994 व 1999 च्या विधानसभा निवडणुकीत विनोद मोहितकर यांना वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेतर्फे तिकीट देण्यात आले. मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
ते तिस-या खेपेच्या तयारीत होते. मात्र त्या काळात अचानक विश्वास नांदेकर यांचा राजकारणात उदय झाला. विविध आक्रमक आंदोलन यामुळे अल्पावधीतच विश्वास नांदेकर लोकप्रिय झाले. परिणामी पक्षाने विनोद मोहितकर यांच्या ऐवजी विश्वास नांदेकर यांना तिकीट दिले. विश्वास नांदेकर 2004 च्या निवडणुकीत निवडूनही आले. विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे दुसरे नेतृत्व तयार झाल्याने विनोद मोहितकर हे तेव्हापासून राजकारणापासून दूर झाले. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र ते कधीही काँग्रेसच्या कुठल्या कार्यक्रमात सक्रीय नव्हते.
मनिष सुरावार हे मुळचे शिवसैनिक. शिवसेना प्रणीत विद्यार्थी सेनेच्या माध्यामातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थी सेनेच्या प्रदेश कार्यकारिणीवर ते होते. मात्र राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळा पक्ष काढल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला. मात्र पुढे राजू उंबरकर यांच्याशी मतभेद झाल्याने ते मनसेतूनही बाहेर पडले. मनसेतून ते भाजपमध्ये गेले. मात्र ते नावालाच भाजपमध्ये होते. त्यांचा मुळ बाणा हा शिवसैनिक म्हणूनच आहे. विनोद मोहितकर यांच्यासारखे ते देखील पक्ष सोडल्यानंतर राजकारणापासून अलिप्त राहिले.
राजू तुराणकर यांनी शिवसैनिक म्हणूनच राजकारणात सुरवात केली. पुढे ते नगरसेवक झाले. मात्र त्यानंतर त्यांना पुढे विजय मिळवता आला नाही. पक्षाने त्यांना शहर प्रमुख पद दिले. शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडून पद काढण्यात आले. त्यामुळे नाराज असलेले राजू तुराणकर यांनी इतर पक्षात प्रवेश न घेता शिंदे गटात प्रवेश केला. माजी जि. प. सदस्य टिकाराम खाडे व माजी पंचायत समिती सभापती सुधाकर गोरे, माजी मारेगाव तालुका प्रमुख गजानन किन्हेकर, माजी शहर अध्यक्ष विजू मेश्राम, झरी तालुक्यातील किशोर नांदेकर यांनी देखील शिंदे गट स्थापन होताच शिंदे गटाचा हात धरला.
आनंद दिघे व विनोद मोहितकर यांचे नाते…
ज्या वेळी धर्मवीर आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते. त्याच काळात विनोद मोहितकर हे देखील जिल्हा प्रमुख होते. त्यामुळे त्यांचा आणि आनंद दिघे यांचा जवळचा संबंध होता. दुसरी बाब म्हणजे त्याकाळातील शिवसेनेतील अनेक दिग्गज नेते मोहितकर यांच्या चांगल्या परिचयाचे असून आजही ते त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. आनंद दिघे यांचे शिष्य असलेले एकनाथ शिंदे यांच्याशीही मोहितकर यांची जवळीक असल्याची माहिती आहे. वेगळा गट काढताच विनोद मोहितकर राजकारणात अचानक सक्रिय झाले आहेत. हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल.
शिंदे गटाने वणीत गाजावाजा करीत दस-या मेळाव्याची तयारी केली. तर दुसरीकडे शुकशुकाट दिसून आला. ठाकरे गटातूनही शिवसैनिक दसरा मेळाव्यात गेल्याची माहिती आहे. लवकरच नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. वणी विधासभा क्षेत्रात शिंदे गटाच्या जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत चांगलाच रंग भरण्याची शक्यता आहे. याची डोकेदुखी शिवसेनेसाठी होणार की इतर उमेदवार व पक्षावर याचा परिणाम होणार? वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मुहुतमेढ करणारे विनोद मोहितकर यांना यात किती यश मिळेल? हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र त्यांच्या पुनरागमनामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
हे देखील वाचा:
चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा
ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार
Comments are closed.