सावधान… अफवा पसरवणा-यांविरोधात होणार गुन्हे दाखल
स्थानिक प्रशासन कठोर, एसडीओंचे अफवा न पसरविण्याचे आवाहन
जब्बार चीनी, वणी: सोशल मीडियात सध्या कोरोनाविषयक अफवांना प्रचंड पीक आले आहे. कोरोना हे एक षडयंत्र आहे, प्रत्येक रुग्णासाठी प्रशासनाला एक ते दीड लाख रुपये मिळतात, अवयव काढून विक्री करतात, कोरोना असा कोणता आजारच नाही, रुग्ण घरीच आपोआप बरा होतो, टेस्ट केल्यावर कोरोना नसेल तरी पॉजिटिव्ह येते, असे एक नव्हे तर अनेक मॅजेस तालुक्यात सोशल मीडियावरून पसरत आहे. परिसरात असे मॅसेज गैरसमज वाढण्यास कारणीभूत आहे. मात्र त्याहीपुढे जात लोक अशा अफवांवर विश्वास ठेऊन निदान आणि उपचार टाळत टाळत आहे. यात रुग्णसंख्या वाढण्याचा धोका असतो, शिवाय रुग्णाचा आजार वाढल्यास प्रसंगी जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा अफवा पसरवणा-यांविरोधात प्रशासनाने आता कठोर पावलं उचलले आहे. कोरोनासंदर्भात अफवा किंवा गैरसमज पसरवत असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जसजशी संख्या वाढत आहेत. तसतसे सोशल मीडियावर फेक मॅसेजद्वारे अफवांना चांगलाच ऊत आला आहे. परिणामी लोकांमध्ये गैरसमज पसरत असून या अफवांवर विश्वास ठेवत लोक आजारी असूनही टेस्ट व उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहे. ही एक गंभीर बाब आहे. यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका व त्वरित टेस्ट करा – डॉ. शरद जावळे
कोरोना रुग्णांना रिकव्हर होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी देते. मात्र लोक अशा अफवांवर विश्वास ठेऊन टेस्ट व उपचार करण्यास टाळतात. आठ दहा दिवसांनी पुढे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी होते व श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी रुग्ण उपचारासाठी दाखल होतो. सर्दी, खोकल्यासारखे लक्षणं असणा-या रुग्णांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यात सारी सारख्या रोगाची लागण होते. अशा गंभीर परिस्थितीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यावर डॉक्टरांच्याही उपचार करण्यावर मर्यादा येतात.सध्या आपल्या भागातच नाही तर सर्वीकडेच सुमारे 90 टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, चव, गंध यासारखे कोणतेही लक्षणं आढळत नाही. त्यामुळे त्यांना निरोगी असल्याचे वाटते, मात्र ती व्यक्ती कोरोनाबाधित असते. अशी व्यक्ती बाहेरून जरी निरोगी वाटत असली तरी त्या व्यक्तीपासून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे टेस्ट केलेली प्रत्येकच व्यक्ती पॉजिटिव्ह निघते ही केवळ अफवा आहे. याशिवाय कोरोनाच्या प्रत्येक रुग्णांमागे पैसे मिळत असल्याचा जो मॅसेज पसरत आहे, त्यात काहीही तथ्य नाही.
अफवा पसवणा-यांवर गुन्हे दाखल करणार
ज्या कुणी व्यक्ती सोशल मीडियावरून अफवा व गैरसमज पसरवत असेल अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. यासाठी सायबर क्राईमचीही मदत घेतली जाईल. अफवा आणि गैरसमज यातून रुग्णांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. काही शंका, गैरसमज असल्यास प्रशासनाला याची माहिती द्या. आजार घरी न काढता त्याची माहिती प्रशासनाला द्या किंवा त्वरित टेस्ट करा. वेळीच कोरोना डिटेक्ट झाल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)