बेजबाबदार वणीकर…. जत्रा मैदानात भरली लोकांची ‘जत्रा’

प्रशासन सुस्त, वणीकर जनता मस्त

0

विवेक तोटेवार: आतापर्यंत पाळलेली शिस्त आज वणीकरांनी मोडत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. जे वणीकर काल पर्यंत अंतर राखा, सोशल डिस्टन्सिंग पाळा म्हणत होते त्याच लोकांनी आज रविवारी मात्र जत्रा मैदानात एकच गर्दी केली. सकाळी एपीएमसी मार्केटमध्ये सुरु झालेल्या मंडईत गर्दी केल्यानंतर दुपारी वणीकरांनी आपला मोर्चा जत्रा मैदानातील आठवडी बाजाराकडे वळवला. परवानगी नसतानाही लोकांनी स्वयंस्फुर्तीने आठवडी बाजार सुरू केला. इथे सर्वात धिंगाणा मांस विक्रेत्याकडे होताना दिसून आला. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचा लोकांनीच फज्जा उडवत बेजबाबदार पणाचे दर्शन वणीकरांनी घडवले.

रविवार म्हणजे वणीकरांचा चिकन, मटन, मासे खाण्याचा व आठवडी बाजारात जाऊन खरेदी करण्याचा दिवस. सकाळी जत्रा मैदानावर चिकन शॉपकडे लोकांनी पाठ फिरवली मात्र दुपारनंतर वणीकरांचा हुरुप चांगलाच वाढला. आठवडी बाजार बंद असतानाही लोकांनी स्वयंस्फुर्तीने आठवडी बाजार भरवला. त्यात लोकांनी एकच गर्दी केली. चिकन मटन चालकांना केवळ जत्रा मैदानात जागा दिली असतानाही त्यांनी त्यांच्या मुळ जागी दुकानं सुरू केले.

मटन आणि मासे विक्रेत्याकडे गर्दी

गेले काही दिवस मांस विक्रीला बंदी होती. त्यामुळे आज बंदी हटताच वणीकरांनी आठवडी बाजारात मटन आणि मासे खरेदी करण्यास एकच गर्दी केली. ही गर्दी नाही तर अक्षरक्षा धिंगाणा होता. सोशल डिस्टन्सिंग वगैरे असा काहीही प्रकार इथे दिसून आला नाही. सोशल मीडियात चिकन बाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्यानंतर लोकांनी मटन आणि मास्यांकडे आपला मोर्चा वळवला परिणामी लोकांची एकच झुंबड उडाली.

आठवडी बाजाराला परवानगी नसतानाही लोकांनी धान्य, भाजी, भजी, जिलेबी, तसेच इतर वस्तूंचे दुकानं जत्रा मैदानात लावले. इतर रविवारी लागणा-या आठवडी बाजारापेक्षा ही संख्या कमी असली तरी जत्रा मैदानात भरलेली गर्दी ही हजाराच्या घरात होती. हा मॉब जास्त असल्याने पोलीस प्रसासनाला त्यावर कन्ट्रोल करणेही शक्य नव्हते.

प्रशासन सुस्त वणीकर मस्त

सकाळी एपीएमसीमध्ये गर्दी होणार याची प्रशासनाला कल्पना असूनही प्रशासनाने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे तिथे एकच गर्दी झाली. हाच प्रकार पुन्हा जत्रा मैदानात दिसून आला. तिथेही ना प्रशासनाने याकडे लक्ष दिले ना वणीकरांनी. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना संपर्क साधला असता त्यांनी लगेच घटनास्थळी टीम रवाना केली. इतके दिवस वणीकरांनी सहकार्य केले. यापुढे ही लोकांनी नियम तोडू नये असे आवाहन त्यांनी वणीकरांना केले. एकूनच वणीकरांनी सोशल मीडियावर बाहेर निघू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे ज्ञान पाजळत असताना दुसरीकडे मात्र याचं उल्लंघन करत बेजबाबदारीचं दर्शन घडवलं.

सकाळी लोकांची मंडईतील गर्दी
Leave A Reply

Your email address will not be published.