विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी वरोरा रोडवरील एका इमारतीमध्ये काम करीत असताना मजुराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रजिस्टर ऑफिस जवळच्या इमारतीत टाईल्स कापत असताना सदर अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
कामानिमित्त अनेक राज्यांतून मजूर वर्ग वणीत येत असतात. काम करून चार पैसे मिळवावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा हा त्यामागचा उद्देश. असाच रामप्रकाश हा कामासाठी वणी येथे आला. त्यादरम्यान तो आपल्या काकांच्या घरी रंगनाथ नगर येथे राहून मिळेल त्या ठिकाणी काम करीत होता. शनिवारी काम करीत असताना रामप्रकाश रजेपाल वर्मा (24) रा. कानपूर जिल्हा सेस्वाल गाव महुवा हा टाईल्स कापत असताना अचानक मशीनची लोखंडी चकती सुटली व ती सरळ रामप्रकाशच्या मानेवर लागली. मानेवर लागताच मानेची धमणी कापली. जोरात रक्तस्राव सुरू झाला. त्याच्यासोबत काम करणाऱ्या इसमानी रामप्रकाश यास त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी रामप्रकाशला मृत घोषित केले.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्याच्या जीव कदाचित 30 सेकंदातच गेला असावा. रामप्रकाशच्या अकस्मिक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे दोन चिमुकली मुले आहेत. त्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी सांगितले की, आज काम शेवटच्या टप्प्यात होते. काम संपवून सर्व जण आता आपल्या गावाला जाणार असल्याची माहिती दिली