बुलेटची दुचाकीला धडक, एक ठार व एक जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव बुलेटने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. रविवार 21 नोव्हे. रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर हा अपघात झाला. पवन मेश्राम (32) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून तो गणेशपूर येथील रहिवाशी आहे. 

कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवन आपल्या मित्र गौरव सुरेश विधाते याच्या दुचाकीने (MH29 BB0744) मागे बसून येत होता. दरम्यान संतधाम जवळ कायरकडे जाणाऱ्या एका भरधाव बुलेट गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला पवन दुचाकीवरून कोसळून रस्त्यावर पडला. अपघातात पवनच्या डोक्याला जबर मार लागला.

अति रक्तस्रावमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवीत असलेला त्याच्या मित्रालासुद्दा गंभीर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पवनच्या कुटुंबीयांनी लगेच पवनला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अपघात घडताच बुलेट चालक बुलेट घटनास्थळी सोडून पसार झाला. पोलिसांनी बुलेट मोटरसायकल (MH34 AR4334) जप्त करून ठाण्यात लावली. पोलिसांनी अज्ञात बुलेटस्वार विरुद्ध गुन्हा दाखल करून शोध घेत आहे. मृतक पवन मेश्रामच्या मागे आई, वडील, पत्नी, 2 वर्षाची मुलगी व 3 भाऊ व कुटुंब आहे.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक वणीतून नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे नम्र आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

Comments are closed.