सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी जवळील वागदरा येथील एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात तरुण जागीच ठार झला. करंजीजवळील खातारा या गावाजवळ हा अपघात झाला. नामदेव बैरू आत्राम असे मृताचे नाव आहे. धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नामदेव बैरू आत्राम (30) हा बोटोणी जवळील वागदरा या गावातील रहिवाशी होता. तो शेती करायचा. मंगळवारी दिनांक 11 जानेवारी रोजी तो त्याच्या स्प्लेंडर या दुचाकीने (MH29 H9338) काही कामानिमित्त करंजी वडकी रोडवर असलेल्या मुंजाळा (अडणी) या गावी त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता. तिथून रात्री तो वडकीच्या दिशेने निघाला होता.
रात्री 7:30 सुमारास दुचाकीने वडकीच्या दिशेने जाताना खातारा गावाजवळ एका ट्रकने (MH40 AK3264) नामदेवच्या दुचाकीला जबर धडक दिली. घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती वडकी पोलिसांना देऊन नामदेवला उपचारासाठी करंजी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
धुक्याने घेतला जीव?
प्राप्त माहितीनुसार नामदेव हा राँग साईडने गाडीने जात होता. नातेवाईकाच्या घरून निघाल्यावर त्याने वागदरा परत जात असल्याचे सांगितले होते. मात्र करंजीच्या दिशेने जाण्याऐवजी तो वडकीच्या दिशेने कसा गेला हे कळू शकले नाही. अपघाताच्या वेळी रस्त्यावर प्रचंड धुके होते. त्यामुळे रस्ता न दिसल्याने अपघात झाल्याची शक्यता घटनास्थळावरील लोकांनी वर्तवली आहे.
नामदेव हा शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्या कडे 5 एकर शेती होती. तसेच घरातील ती एकटीच कर्ता व्यक्ती होती. नामदेवच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा:
गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर
Comments are closed.