अपघात- नायगावजवळ दोन भरधाव ट्रकची समोरासमोर भीषण धडक

एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी.... अपघात इतका भीषण होता की यात एक ट्रक उलटला तर दुस-या ट्रकची कॅबिन चेंदामेंदा झाली.

जितेंद्र कोठारी, वणी: नायगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात एक ट्रकचालक जागीच ठार झाला तर एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वणीतील ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे. मौला अली मेहमूद शेख (47) रा. जळकोट जिल्हा उस्मानाबाद असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की सध्या वणी-वरोरा रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. आज गुरुवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास एक ट्रक (टँकर) वणीकडून वरो-याच्या दिशेने जात होता. तर दुसरा ट्रक हा वरो-याकडून वणीच्या दिशेने येत होता. वणी नजीक असलेल्या नायगाव जवळ एकेरी वाहतूक आहे. सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास नायगाव जवळील पेट्रोलपम्प जवळ भरधाव असलेले दोन्ही ट्रक समोरासमोर भीडले.

ही धडक इतकी भीषण होती की यात वरो-याकडून येणारा ट्रक (टँकर) उलटला तर दुस-या ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. अपघातात उलटलेल्या ट्रकमधला चालक जागीच ठार झाला. तर दुस-या ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला. जखमी ट्रक चालकाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघात होताच रस्त्यावरून जाणा-या लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. त्यातील एकाने अपघाताची तातडीने माहिती वणी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला तातडीने वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकेरी वाहतूक की धुके?
वणी-वरोरा रोडचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. सध्या थंडी वाढल्याने या मार्गावर धुके देखील दाटलेले असते. एकेरी वाहतूक असल्याने दोन्ही ट्रक समोरासमोर आले व धुक्यामुळे समोरील वाहन न दिसल्याने भरधाव असलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

Comments are closed.