गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा भीषण अपघात

कायरच्या तरुणाचा सासुरवाडीला जाताना अपघात

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या गंजचा मारोती जवळील संविधान चौकात एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. गजू आत्राम (34) असे जखमीचे नाव असून तो कायर येथील रहिवासी आहे. सध्या जखमीला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

गजू हा मेकॅनिक असून त्याचे महांकालपूर फाट्यावर गॅरेज आहे. आज सकाळी तो कायरहून त्याच्या होन्डा कंपनीच्या दुचाकीने (MH29 BZ7222) भद्रावती जवळ त्याच्या सासुरवाडीला जात होता. दरम्यान सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास संविधान चौकात त्याचा अपघात झाला. अपघात होताच गुंजचा मारोती जवळ असलेले भाविक व रस्त्यावरून जाणारे लोक घटनास्थळी गोळा झाले. अपघातात गजूच्या डोक्याला भीषण मार लागला होता.

गोळा झालेल्या नागरिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना देऊन ऍम्बुलन्स बोलावली. गजूला आधी ग्रामीण रुग्णालय वणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून जखमीला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले. गजूला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या गजूची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

नियंत्रण सुटल्याने अपघात?
गजू हा गंभीर अवस्थेत संविधान चौकात आढळून आला. चालकाचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीने चौकातील पोलला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की धडकेमुळे दोन्ही पोल वाकले. तर चालकाचे डोके पोलला लागले. त्यामुळे डोक्याला जबर ईजा होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अज्ञात वाहनाने धडक दिली असावी, असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा; 

सिंधी वाढोणा येथील अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

Comments are closed.