बहुगुणी डेस्क, वणी: वणी-मुकुटबन मार्गावरील चेंडकापूर गावाजवळ एका दुचाकीला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात दुचाकीचालक ठार झाला तर दोघे सहप्रवासी गंभीर जखमी झालेत. शनिवारी दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रफुल्ल संजय गागरे (25) रा. पिपरड ता. झरी असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल संजय गागरे (वय 25) हा तरुण पिपरड ता. झरी येथील रहिवासी होता. तो शनिवारी सुजल भोयर (वय 20) आणि त्याची बहिण आंचल भोयर (वय 18) यांच्यासह दुचाकीने (MH 29 CL 1324) वणी येथे आला होता. काम संपल्यानंतर ते तिघेही गावी परत जात होते. दरम्यान पेटूर जवळील चेंडकापूर गावाजवळील टर्निंगवर भरधाव ट्रकने (MH 34 BG 8277) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरचे तिघेही रस्त्याच्या दूर फेकले गेले. या अपघातात प्रफुल्लच्या डोक्याला जबर मार लागला. तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत. अपघात होताच रस्त्यावरून ये-जा करणा-या नागरिकांनी याची माहिती ऍम्बुलन्सला व शिरपूर पोलिसांना दिली. ऍम्बुलन्सने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
सुजल आणि आंचल भोयर हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर वणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला असून, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत.



Comments are closed.