बहुगुणी डेस्क, वणी: नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (GMC) अवयवदानाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. त्याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने नागपूर जीएमसीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे वणीतील सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांनी सहका-यांसह हा पुरस्कार स्वीकारला. भारतीय अवयवदान दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नॅशनल आर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट आर्गनायझेशन (नोटो) तर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. उत्कृष्ट ह्यब्रेनस्टेम डेथ डिक्लेरेशन कमिटी (बीएसडी) बाबत टीमचा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
अवयवदान दिनाच्या पर्वावर 2 ऑगस्टला दिल्लीत झालेल्या या समारंभात केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर, शल्यक्रिया विभागाचे डॉ. आशुतोष जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव निवेदिता शुक्ला-शर्मा, आरोग्य सेवा महांसचालक डॉ. सुनिता शर्मा, नोटोचे संचालक डॉ. अनिल कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी अवयवदान प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व संबंधित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्जन डॉ. आशुतोष जाधव हे मुळचे वणीचे असून सध्या ते नागपूर जीएमसी येथे शल्यक्रिया विभागात सेवा देतात. तसेच दर रविवारी ते वणीत आरोग्यसेवा देतात. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




Comments are closed.