अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक

मुंबईला जाण्याचा प्लान मध्येच पडला फेल, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मजनूला वणी पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. ऋतिक हनुमान पेंदोर (22) रा. कळमना (खुर्द) ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रार व मुलीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 363, 366 (अ), 376 व पॉक्सो अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. 
प्राप्त माहितीनुसार ऋतिक पेंदोर यांने ओळखीतील एका 17 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत 15 एप्रिल रोजी मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात आरोपी ऋतिक पेंदोर विरुद्द मुलीला पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती.
True Care
गेल्या 20 दिवसांपासून वणी पोलीस आरोपी व अल्पवयीन मुलीच्या शोधात होते. मात्र दोघांचे मोबाईल बंद असल्यामुळे त्यांचे लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान बुधवार 4 मे रोजी मुलीने तिच्या एका मैत्रिणीला एका अनोळखी मोबाईल क्रमांकवरून कॉल केला. आता मी पुणे येथून मुंबईला जात असल्याची माहितीही तिने मैत्रिणीला दिली.  ही माहिती पीडितेच्या मैत्रिणीने वणी पोलिसांना सांगितली.
असा सुरू झाला पाठलाग..
पोलिसांनी मैत्रिणीच्या मोबाईलवर आलेले नंबर ट्रेस करून कॉल केला असता सदर नंबर ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचा निघाला. ट्रॅव्हल्स चालकांने एक मुलगा आणि मुलगी बस मध्ये असल्याची माहिती दिली. यावरून तपास अधिकारी सपोनि माया चाटसे यांनी लगेच डायल 112 नंबरवर कॉल करून मदत मागितली. डायल 112 सेवेचे अधिकारी सपोनि आनंद पिंगळे हे पथक घेऊन हायवेवर गेले. नवी मुंबईतील कामोठे येथे त्यांनी ट्रॅव्हल्स बस थांबवले असता तिथे आरोपी ऋतिक पेंदोर व अल्पवयीन मुलगी आढळून आली.  
वणी पोलिसांनी त्याच दिवशी मुलीच्या आईला सोबत घेऊन एक पथक नवी मुंबईला पाठविले. 5 मे रोजी आरोपी व अल्पवयीन मुलीला त्यांनी ताब्यात घेतले. आरोपीला वणी न्यायालयात हजर करून 9 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे करीत आहे.
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!