सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः लग्न म्हटलं की सगळ्यात आधी तामझाम येतोच. हुंडा, मानपान, अहेर, अवाढव्य खर्च, सरबराई आणि नक्को नक्को ते. पण शहरात झालेला एक विवाह सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता. लग्न होतं किसन पद्मा संभाजी कोरडे आणि शुभांगी दीपा नितीन म्हशाखेत्री या जोडप्याचं.
किसन संभाजी कोरडे या युवकाने गुरू रविदास यांच्या विचारांनुसार लग्नविधी केला. या लग्नात कोणताही भटजी वा पंडित नव्हता. कोणत्याही ज्योतिष्याकडून याचा मुहूर्त काढला नव्हता. सगळ्यांना सोयीची होईल अशी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. हुंडा हा प्रकार तर मुळीच नव्हता. पाहुण्यांनादेखील अहेर किंवा इतर अनावश्यक रूढी टाळण्याचा कमालीचा आग्रह होता.
किसन या युवकाने शुन्यातून आपले विश्व उभे केले. गुरू रविदासांनी कर्माला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या विचारांवर कायम राहून किसन वणीतील टिळक चौकात आपले कोरडे बूट हाऊस प्रामाणिकपणे चालवितो. संत तुकारामांच्या ‘‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’’ या उक्तीप्रमाणेच आपला व्यवहार करतो. ग्राहकांसोबत व आपल्या कामासोबत सदैव प्रामाणिक राहणाऱ्या किसनने आपला व्यवसाय समृद्ध केला. चहा किंवा कोणत्याच कामाकरिता किसन आपले दुकान कधीच सोडत नाही.
नुकत्याच झालेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये किसनचे फार मोठे योगदान आहे. इथेदेखील लोकांना वैचारिक लाभ व्हावा म्हणून त्याने प्रयत्न केलेत. प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात किसन व त्याची टीम यशस्वी ठरली. गुरू रविदासांच्या वचनांप्रमाणे तो कोणताच भेद पाळत नाही. मराठा सेवा संघ आणि अशाच अनेक समविचारी संघटनांशी तो जुळला आहे.
किसनच्या लग्नात दर्शनी भागात गुरू रविदास, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा लावल्या होत्या. स्वरांगण संगीत संचाचे संजय गोडे व टीम महामानवांवर आधारित गीतांचे व भावगीतांचे सादरीकरण करत होते. प्रबोधनपर पुस्तकांचे दुकानदेखील लग्नमांडवातच होते. एकमेकांसोबत प्रामाणिक राहण्याची जाहीररीत्या प्रतिज्ञा घेतली. वधूपक्ष किंवा वरपक्ष असादेखील कुठेच भेद या लग्नात नव्हता. लग्नपत्रिकेतदेखील गुरू रविदासांचे विचार मांडले हेाते. या सोहळ्याला नांदेड येथील चंद्रप्रकाश देगलुरकर, यवतमाळ येथील संजय तरवरे, संभा वाघमारे, मोहन हरडे, अशा विविध सामाजिक क्षेत्रांतील मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. किसन आणि शुभांगी यांच्या विज्ञानवादी व आगळ्यावेगळ्या विवाहाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.