विक्रमादित्य ठरला आदित्यविक्रम….
आयपीएस आणि आयएएस परीक्षांतील यशवंत वणीचा आदित्यविक्रम हिराणी
तो दहावीला होता. गणिताची ट्युशन लावायची होती. ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांची अटदेखील निराळीच होती. शिक्षकांनी गणिताचा पेपर त्याच्या हातात दिला. एका तासात जर गणित सोडवलेस तरंच ट्युशन पक्की. नाहीतर दुसरा पर्याय शोधा. आदर्श हायस्कूलचे दशरथ वऱ्हाटे सर गणिताचे ‘‘मास्टर’’ होते. त्यांची शिकवणी मिळालीच पाहिजे असा ध्यास दोन्ही बापलेकांचा होता. सोबत आलेले वडील प्रचंड टेन्शनमध्ये आले. तो पेपर सोडवायला बसला. बाहेर वडील चौकात येरझारा मारत होते. त्यांचाही बीपी प्रचंड वाढला होता. शेवटी लेकराच्या भविष्याचा विषय होता. एक तासाचा तो गणिताचा पेपर त्याने केवळ 20 मिनीटांतच सोडविला आणि शालेय जीवनातला जणू पुन्हा एक मोठा विक्रम या आदित्याने म्हणजेच सूर्याने केला होता. आदित्यविक्रम मोहन हिराणीला पहिलं यश एन्टरन्स टेस्टलाच मिळालं. वडील मोहन हिराणी सुखावले. त्यांना हायसं वाटलं. हाच आदित्यविक्रम एकेक विक्रम करीत यशाचे शिखर गाठतच गेला.
मागील वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची निवड झाल्यावर आदित्यची निवड आयपीएसच्या प्रशिक्षणासाठी झाली. आयपीएसचं प्रशिक्षण सुरू असतानाच आयएएसचा निकाल घोषित झाला. तो देशातून 60व्या क्रमांकावर यशस्वी झाला. आदित्यविक्रम मोहन हिराणी या युवकाने आयपीएस आणि आयएएस या दोन्ही परीक्षांमध्ये भरभरून मिळवलं होतं. तो केवळ हिराणी परिवाराच नव्हे तर संपूर्ण वणीकरांच्या अभिमानाचा विषय झाला होता. वाजतगाजत संपूर्ण वणीकरांनी त्याची मिरवणूक काढली. अक्षरशः सगळ्यांनीच त्याला डोक्यावर घेतलं होतं. हिराणी परिवाराशी जुळलेलेच नव्हे तर ज्यांना ज्यांना कळलं ते ते सगळे शुभेच्छांचा वर्षाव करायला हिराणी परिवाराच्या आनंदोत्सवात दाखल झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी एक तालुक्याचं ठिकाण. मोजकीच शिक्षणाची व्यवस्था. कुठलंच इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तो सुरुवातीच्या काळात वणीतल्याच ग्राउंडवर रनिंगसाठी जायचा. अनेकजण त्याच्यासाठी 17,000 ते 20,000 रूपयांचे शूज घेतात. आदित्यला त्याची गरज भासली नाही. वणीसारख्या ठिकाणी विशेष अशा प्रशिक्षणाचीदेखील व्यवस्था नाही. लहान गावातून आलो याचा न्यूनगंड कधीच कोणी बाळगू नये असे तो म्हणतो. प्रतिभा, टॅलेंट सगळीकडे सारखंच असतं. ग्रामीण वेगळं आणि नागरी किंवा शहरी वेगळं असा भेद करता येत नाही. घरातदेखील शिक्षणाचं असं विशेष वातावरण नाही. पण आदित्यने आपल्या प्रज्ञेच्या आणि परिश्रमाच्या बळावर सिद्ध केलं, की यश मिळवायचंच म्हटलं तर कोणतीच गोष्ट आड येत नाही. आदित्यचं बालपण वणीतच रमलं.
आदित्यविक्रमने चवथीपर्यंतचे शिक्षण विद्यावर्धिनी वणी येथे घेतले. दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने वरोरा येथील सेंट अॅन्स स्कूल येथे पूर्ण केले. अकरावी आणि बारावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नागपूरला केले. राजस्थान येथे बिटस् पिलानी कॉलेज येथे त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग केलं. युपीएससीची तयारी करण्यासाठी तो दिल्लीला गेला. 2014मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याने 1344 क्रमांक प्राप्त केला. रक्षा विभागात त्याला सहायक संचालक म्हणून नियुक्ती मिळाली. यशाचं एक उंच शिखर त्याने गाठलं होतं. त्यापुढील अनेक शिखरं त्याला खुणावत होती. 2016मध्ये पुन्हा त्याने 113वं स्थान मिळवलं. मात्र आयएएससाठी त्याची निवड होऊ शकली नाही. त्याला आय.पी.एस. प्रशिक्षणासाठी हैद्राबादला पाठविण्यात आलं. 2017 ला त्याने आएएसची परीक्षा दिली. आदित्य देशातून 60व्या क्रमांकावर आला. सलग तिसऱ्यांदा त्याने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. श्रीकांत जिचकार हे विदर्भातले पहिले गुणी होते ज्यांनी आयपीएस आणि आयएएस परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. आदित्य हा दुसरा ठरला. वणीचाच जर विचार केला तर तालुक्यातील कुरई येथील कलेक्टर झालेले विजय झाडे यांच्यानंतर देखील हा विक्रम आदित्यचाच आहे.
आदित्यचे इंग्रजीचे शिक्षक मधुकरराव भुरचंडी यांना त्याच्यातील हे ज्ञानतेज त्याच्या विद्यार्थीदशेतच दिसले होते. भुरचंडी सरांनी त्याला इंग्रजीत परफेक्ट केलं. कृतज्ञता म्हणून त्याने 2006 साली आपल्या शिक्षकाला पत्रदेखील लिहिलं होतं. वऱ्हाटे सर आणि भुरचंडी सर यांच्याप्रती तो आजही कृतज्ञ आहे. एवढ्या मोठ्या यशानंतरही त्याच्यातील वंशपरंपरेने आलेली नम्रता सगळ्यांनाच जाणवते.
लहानपणापासूनच आदित्यला वाचायची प्रचंड आवड. मिळेल ते वाचायला त्याला आवडतं. वेगवेगळे विषय त्यांनी वाचून काढलेत. वाचनासोबतच त्याला अॅथलेटिक्समध्ये प्रचंड आवड. वणी शहरात एकमेव शासकीय मैदान आहे. सहाव्या वर्गात असताना त्याची पहिली हजेरी या मैदानावर लागली. इथे हा रोज रनिंग व इतर एग्जरसाईजसाठी जायला लागला. तिथे पोलिसभरती प्रॅक्टीस करायला अनेक तरुण यायचे. हा सगळा त्याच्या नियमित अभ्यासाचाच भाग झाला. रनिंग आणि इतर शारीरिक कसरतीने त्याचे शरीर बनले होते. प्रत्यक्ष आयपीएसच्या ट्रेनिंगवेळी जेव्हा त्याचे इतर नवे साथिदार थकायचे, गळायचे तेव्हा सरावाने तयार झालेला आदित्य मात्र नेहमी फीट राहायचा. मग त्याला आपल्या गावातल्या मैदानाची आठवण स्फूर्ती द्यायची. साडे चार वर्षे त्याने प्रचंड मेहनत घेतली. या परिश्रमाची फलशृती झाली. त्याने आयपीएस आणि आयएएस या दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळविले.
आदित्य अभ्यासक्रम आणि त्याचा आवाका सांगू लागला. केंद्रस्तरावर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा होत्या. त्याचा आवाका किती मोठा असतो. सगळंच अभ्यासक्रमाचा जणू भाग असतो. आदित्य म्हणाला की, वाचायला घेतलं तर तुम्हाला सगळंच वाचावं लागेल. पण आपल्याकडे वेळ फार कमी असतो. नियोजित वेळेत आपण आपला अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘ऑर्गनाईज्ड स्टडी’ करणे अत्यंत आवश्यक आहे. आदित्य साडे बारा तास रोज अभ्यास करायचा. पाच विषयांसाठी त्याने प्रत्येकी अडीच तास राखून ठेवले होते. अभ्यास हा टार्गेट ठेवूनच केला पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. एकाच विषयाला दिवसरात्र घेऊन बसलं तर कंटाळा येईल. दुसरी गोष्ट म्हणजे अन्य विषयांना हवा तेवढा वेळ देता येणार नाही. म्हणूनच नियोजनबद्ध अभ्यास केल्यास जे हवं ते सगळं मिळतं, असा त्याचा विश्वास आणि अनुभवदेखील आहे.
करंट अफेअर्स; दैनंदिन घडामोडीदेखील अभ्यासक्रमाचाच भाग आहे. रोज वर्तमानपत्रांचं वाचन, टिव्हीवरील बातम्या, इंटरनेटवरील न्यूजपोर्टल्स आणि विविध वेबसाईटस्च्या माध्यमातून स्वतःला अपडेट ठेवणं आवश्यक असल्याचं आदित्य म्हणाला. हे आपण अगदी सहजतेने; पण अत्यंत गांभीर्याने केले पाहिजे असं आदित्य म्हणतो. पोलिसी ट्रेनिंग असलेला आदित्य अत्यंत गांभीर्याने सगळी कामे करीत असल्याचं त्याच्या देहबोलीवरूनच, बॉडी लँग्वेजवरून लक्षात येतं.
आदित्यला सहज विचारलं की आयपीएस आणि आयएएसमध्ये तुला जास्त काय भावतं. कॉलेजलाईफमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक राहिलेल्या आदित्यचं प्राधान्य आएएसलाच राहिलं. तो म्हणाला की, आयपीएसपेक्षा आयएएसमध्ये अधिक स्कोप आहे. पोलीससेवेत गुन्हे नियंत्रण, त्यांना आळा घालणे एवढ्याच मर्यादा असतात. आदित्यला शिक्षण या क्षेत्रात प्रचंड रस आहे. त्याला या क्षेत्रासाठी बरंच काही करायची इच्छा आहे. तो म्हणाला, आयएएस झालं की मला सगळ्याच क्षेत्रांत करण्यासारखं बरंच आहे. शिक्षण, आरोग्य, जनजागृती आणि गुन्हे नियंत्रणदेखील आयएएस क्षेत्रातच शक्य आहे. इंग्रजी आणि भूगोल या विषयांत त्याची मास्टरी असल्याने त्याने हे विषय आपल्या सहकारी आणि ज्युनिअर्सला शिकविलेदखील आहेत. तो म्हणतो की, शिक्षण हा सर्वच विकासांचा पाया आहे. केवळ पुस्तकी शिक्षणाला काही अर्थ नाही. व्यावहारिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे.
आदित्य बोलता बोलता अधिक मोकळा होऊ लागला. बासरीवादनाचाही त्याला छंद आहे. कोलकात्याच्या एका गुरुंकडे त्याने त्याचे प्रारंभिक धडेदेखील घेतले आहेत. अभिनय, अॅस्ट्रॉलॉली, मेडिटेशन आणि रेकी प्रॅक्टीसमध्ये त्याला विशेष रुची आहे. त्याच्या या सर्व तयारींच्या काळात त्याने हे सगळं जपलं. त्यामुळे त्याला मानसिक तणावांपासून तो नेहमी मुक्त राहिला. आजोबा दिवंगत हिरालालजी नथ्थुभाई हिराणी यांचा जनसंपर्क व्यापक होता. समाजात ते लोकप्रिय होते. ते यशस्वी व्यावसायिक होते. वडील मोहन आणि काका मुकेश हिराणी दोघेही विनम्र आणि शालीन. आई भावना हिराणी, काकू वंदना हिराणीआणि एेश्वर्या व पार्थसारथी ही भावंड असा छानसा त्याचा परिवार आहे. तसेच मित्र, कार्यालयीन सहकारी, त्याचे चाहणारे आणि त्याला आदर्श मानणारे असाही त्याचा बराच मोठा परिवार आहे.
वडील आणि काका दोघांनाही शायरीचा शौक आहे. लहानपणापासून कवितांच्या सानिध्यात तो मोठा झाला. शाळेत असतानाच तो कवितादेखील लिहायला लागला. तो म्हणतो की, एक कविता एका मोठ्या गं्रथासारखं बरंच काही देते. जगण्यातील अनेक कठीण प्रसंगात हीच कविता आशेचं बळ देते. माणूस म्हटलं की, यशही येतं आणि पराभवदेखील. यातून आपली उमेद ढळू न देता लढत राहणं महत्त्वाचं असतं. आदित्य प्रचंड आशावादी आणि जीवनाप्रती सकारात्मक आहे. तो म्हणतो, वादळात अनेकदा पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होतात. तरीदेखील पक्षी हताश होत नाहीत. पुन्हा नव्याने नव्या घरट्याच्या बांधणीला ते सुरुवात करतात. बरेचदा वाटतं की आपलं सर्वस्व संपलं आहे; पण ते कायमचं संपणं नसतं. नव्याने पुन्हा उठून उभं राहिलं पाहिजे. फिनिक्स पक्षासारखं स्वतःला उभारी देणं गरजेचं असतं. आदित्य त्याच्याच एका कवितेत म्हणतो………
उजड़ा हैं एक घरौंदा कल की बरसात में
तिनका बटोरें हैं पंछी अगली ही प्रभात में
नई शुरुआत करने की एक लौ दिलों में जलती हैं
उम्मीद पर दुनिया चलती हैं
मंजिल पाने की तो सबको चाह होती है
पर गिर के सँभालने वालो की ही वाह होती हैं
ठोकर लगने पर मन टूट जाता हैं
इरादों का दामन छूट जाता हैं
आग में जलने पर ही सोने की चमक बढती हैं
उम्मीद पर दुनिया चलती हैं
रात के अंधेरों सी यह असफलता हैं
निराशा के काले रंग में सब ढलता हैं
मत भूल की निश्चित हैं काले बादलों का छटना
अंधकार का मिटना,निराशा का घटना
स्वर्णिम प्रभात के लिए रात काली ढलती हैं
उम्मीद पर दुनिया चलती हैं
यह जो मस्तक की सलवटें और हाथों की रेखा हैं
जिन्हें प्रान्त-प्रान्त के पंडितों ने कई बार देखा है
इनके होने न होने से इंसान नहीं बदलता
चहू ओर से मार खाने पर ही है हीरा चमकता
ऊँचाईया हासिल करने की आस दिलों में पलती है
उम्मीद पर दुनिया चलती हैं
मुश्किल हैं राहें,तू चलता जा
सम्पूर्णता के सांचे में ढलता जा
ज़िन्दगी किसी दिन करवट ज़रूर बदलती हैं
उम्मीद पर दुनिया चलती हैं
सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606