अबब…!  अहेरी येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क बंद 

शाळेतील रेकार्ड गायब, पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

0
रवी ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या अहेरी या वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणारी शाळा चक्क बंद पडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळा बंद पडली असून शाळेतील रेकार्ड अद्याप पंचायत समितीमध्ये नसल्याची माहिती ही समोर आली आहे. याबाबत पंचायत समिती  शिक्षण विभाग मात्र चालढकल भूमिका वठवित आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय समायोजन प्रक्रीयेत वणी पंचायत समितीने बहिष्कार टाकल्याची माहिती आहे. मात्र हा बहिष्कार का टाकला हे एक कोडेच आहे. एकूणच अहेरी शाळा बंद असतांना येथील शिक्षक महिनाभर कुठे होते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

 असाच प्रकार तालुक्यातील अहेरी जिल्हा परिषद शाळेसंदर्भात घडला. अहेरी गावाचे वेकोलिने पुनर्वसन केल्यानं अहेरी येथील शाळा बंद पडली. नवीन सत्राला 27 जूनला सुरूवात झाली. तेव्हापासून या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना पंचायत समितीनं कोणत्याही शाळेवर प्रतिनियुक्ती दिली नाही. सदर शाळा बंद पडल्याचा अहवाल संबधीत मुख्याध्यापकाने पंचायत समितीला सादर केला की नाही हे एक कोडेच आहे.

27 जून पासून शाळा बंद आहे. तर शाळेतील सर्वच रेकार्ड पंचायत समितीकडे सुपूर्द करणे अनिवार्य होते. याबाबत तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय हाडोळे यांना विचारणा केली असता त्यावेळेत कोणतेही रेकार्ड संबधीतांनी दिले नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शाळा बंद असल्याबाबत प्रभारी विस्तार अधिकारी लक्ष्मण इद्दे यांना विचारणा केली असता. शाळा बंद असून संबधीत शाळेवरील शिक्षकांचे समायोजन यवतमाळ येथून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शाळा कधी बंद पडली. विद्यार्थ्यी संख्या किती होती, शाळेतील जंगम मालमत्ता, शालेय दस्ताऐवज, सध्या कुठे आहे. याबाबत कोणालाच माहीत नाही. शाळेतील साहित्य चोरीला गेल्याची तक्रार पोलीसात दिल्याची कुजबूज ऐकायला मिळात आहे. मात्र प्रत्यक्षात या तक्रारीचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

सदर शाळा ही खूप जूनी आहे. या शाळेतून शिक्षण घेवून बाहेरगावी वास्तव्यास गेलेल्या लोकांना शालेय दस्ताऐवजाचे काम पडले तर त्यांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भात पंचायत समितीने कोणत्याही हालचाली केल्या नाही. संबधीत शाळेचे रेकार्ड, जंगम मालमत्ता पंचायत समितीने हस्तांतरीत केल्या शिवाय संबधीत शिक्षकांचे समायोजन करणे उचित नाही. पण सध्या अहेरी येथील बंद शाळेतील शिक्षकांचे जिल्हास्तरावरून समायोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शाळेचे रेकार्डच व जंगम मालमत्ता जमा करण्यातच आली नाही तर समायोजन कसे करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच अहेरी शाळा बंद पडल्यानंतर शिक्षकांनी कोणते कर्तव्य निभावले व अधिका-यांनी कोणते कर्तव्य पार पाडले हे एक कोडेच आहे. या निमित्तानं का होईना वणी पंचायत समितीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

(हे पण वाचा: अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरण: ‘तो’ नराधम जेलमध्ये, तर पत्नीला अटक )

बुधवारला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा बैठक घेतली, त्यात गटशिक्षणाधिका-या पदभार लवकरच देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र गटशिक्षणाधिकारी हे प्रभारावच येतील की कायमस्वरूपी या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. महत्वाची पदे प्रभारावर असल्यानं ग्रामीण भागातील शाळाकडे शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे.

वणी पंचायत समितीचा शिक्षण विभाग सध्या तिथं चाललेल्या भोंगळ कारभारामुळे चर्चेत आहे. कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी नसल्यानं या विभागाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवणा-या शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.