बहुगुणी डेस्क, वणी: काळे ले आऊटमध्ये चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास (रविवारी) घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह घरातील दागिने व होम थिएटर असा सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे चार दिवसांआधीच या ले आऊटमध्ये एक घरफोडी झाली होती. चोरट्यांनी एका व्यक्तीचे घऱ दुस-यांदा फोडले होते. शहरात सातत्याने होणा-या घरफोडीमुळे वणीकरांची दहशत काही केल्या संपत नाहीये.
फिर्यादी अनिल संजय पारखी (वय 32) हे वणी येथील ब्राह्मणी रोडवरील काळे ले-आऊट परिसरात राहतात. ते एका खासगी शाळेत शिक्षक आहे. शनिवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी अनिल हे पत्नीसह चंद्रपूर येथे गेले होते. त्यामुळे घरी त्यांचे वडील एकटेच होते. सुरक्षेच्या कारणावरून ते रात्री शेजा-यांकडे झोपण्यास गेले. मात्र पहाटे 3 ते 4 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
दरम्यान पहाटे 4 वाजताच्या सुमारास अनिल यांच्या वडिलांना जाग आली. त्यांना घरी काही संशयास्पद हालचाल आढळली. त्यांनी तातडीने याची माहिती शेजारी व त्यांच्या मुलाला दिली. दरम्यान शेजा-यांच्या मदतीने घराची पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले होते व चोरटे घरातून निघून गेले होते. घरफोडीची माहिती मिळताच अनिल पारखी हे तातडीने वणीला निघाले. वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा केला. पारखी यांनी वणी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली.
चोरट्यांनी होम थिएटर (किंमत 6,000 रुपये), चांदीचे दोन पाते व तीन घडविलेली पाने (वजन 2.5 तोळे, किंमत 10,000 रुपये), सोन्याचे दोन रिंग व 6 नग बिऱ्या (वजन 4 ग्राम, किंमत 30,000 रुपये), दोन मनगटी घड्याळे (किंमत 4,000 रुपये), वापरलेला मेकअप बॉक्स (किंमत 500 रुपये) आणि रोख 8,000 रुपये असा एकूण 58,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
अनिल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 305(a) व 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे, परंतु शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांआधीच या ले आऊटमध्ये आणखी एक घरफोडी झाली होती.



Comments are closed.