वणीत नगर परिषदेच्या विरोधात अनोखे “बेशरम” आंदोलन
विवेक तोटेवार, वणी: मे महिन्यात वणीतील टिळक चौकात पाण्याची पाईपलाईनचे काम करतांना खड्डा खोदण्यात आला. पाईपलाईनचे काम झाल्यानंतरही खड्डा बुजविण्यात न आल्याने शुक्रवारी सर्वपक्षीय “बेशरम” आंदोलन करण्यात आले.
वणीतील टिळक चौक म्हणजे मुख्य रस्ता. या रस्त्यावरून वाहतुकीची सर्वात अधिक वर्दळ असते. वणी नगर परिषदेने नवीन पाईपलाईन टाकण्याकरिता टिळक चौक येथील रोड खोदून काम केले. याला जवळपास एक महीन्याचा कालावधी पूर्ण झाला. परंतु एक महीना उलटूनही अजून हा गड्डा बुजवण्यास नगर परिषद उदासीन दिसली. या ठिकाणी एस पी एम शाळेचे विद्यार्थी रोज ये जा करीत असल्याने गड्ड्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच वाहतुकीलाही अडथळा होतो आहे.
या पूर्वी या विषयावर वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. परंतु कुंभाकर्णी झोपेत असलेल्या नगर परिषदेला जाग आली नाही. ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी 29 जून रोजी दुपारी 12 वाजता वणीतील सर्व पक्ष एकवटले. त्यांनी अनोखे “बेशरम” आंदोलन केले. या आंदोलनात खड्डा असलेल्या जागी बेशरामचे झाड लावले.
या आंदोलनात भारीप बहुजन महासंघाचे मंगल तेलंग, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे डॉ. महेंद्र लोढा, बसपचे प्रवीण खानझोडे, प्रहार संघटना कडून अखिल सातोकर, काँग्रेसचे राजाभ पाथ्रटकर, शिवसेनेचे राजू तुराणकर, सर्व पक्षीय कार्यकर्ते व वणीकर मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ महेंद्र लोढा यांनी सांगितले की जर 48 तासाच्या आत नगर परिषदेने रोड दुरुस्ती केला नाही तर सर्व पक्ष मिळून याच ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिली.