पोलिसांनी पकडला अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक

रविनगर भागात कारवाई, 7 ब्रास रेती ट्रक जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा टिप्पर (MH 34 BG 1596) वणी पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चालक मुशीर खान रशीद खान पठाण (वय 29, रा. पेपर मिल गेट, बल्लारशहा, जि. चंद्रपुर) याच्यावर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली.

गुरुवारी रात्री पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर हे त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील आणि नंदू पुपलवार यांच्यासह पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान रविनगर परिसरात त्यांना संशयास्पद टिप्पर आढळले. पथकाने टिप्पर थांबवले. तपासात अंदाजे 7 ब्रास रेती (गौण खनिज) आढळली, परंतु चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता.

चालकाला रेतीबाबत विचारणा केली असता त्याने सदर रेती पिंपरी घाट, भद्रावती, चंद्रपूर येथून आणल्याचे सांगितले, परंतु त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) नव्हती. यामुळे रेती चोरीची असल्याची खात्री झाली. चालकाला सुचनापत्र देण्यात आले होते, परंतु त्याने किंवा त्याच्या वतीने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. अखेर रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. टिप्परची किंमत अंदाजे ₹25,00,000 असून, रेतीची किंमत ₹42,000 असा एकूण ₹25,42,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी चालक मुशीर खान रशीद खान पठाण (वय 29, रा. पेपर मिल गेट, बल्लारशहा, जि. चंद्रपूर) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 303(2) आणि जमीन महसूल कायदा कलम 48(8) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशानुसार पो. का. श्याम राठोड, पो. का. भानुदास हेपट, पो. का. नंदकुमार पुप्पुलवार, पो. का. अरविंद बच्चे, आणि पो. का. राहुल बोंडे यांनी पार पाडली. 

Comments are closed.