राष्ट्रवादीचा कायर-घोन्सा सर्कलच्या बुथ प्रमुखांचा मेळावा संपन्न
डॉ. लोढा यांनी फोडले विधानसभेेेेच्या प्रचाराचे नारळ
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गोडगाव इजासन येथे आज बुधवारी दिनांक 3 जुलै रोजी कायर-घोन्सा सर्कल मध्ये येणा-या गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे प्रमुख मार्गदर्शक होते. यावेळी गोडगाव येथील देवस्थानात विधानसभा प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरूवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर डॉ. लोढा यांच्यासह प्रभाकर मानकर, राजाभाऊ बिलोरिया, भरत मत्ते, राजू उपरकर, संदीप दवणे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी कायर-घोन्सा सर्कलमधील संपूर्ण बुथविषयी माहिती घेऊन कमिटी कशी तयार करणे, बुथ बांधणी केवळ निवडणुकीपरती मर्यादीत न बनवता लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेवटच्या व्यक्तीची समस्येची दखल घेऊन त्या समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून समस्या कशा सोडवाव्यात. बुथ प्रमुख व कमिटीची यंत्रणा कशी राबवावी याविषयी उपस्थित मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांना लोकांमध्ये काम करताना येणा-या अडचणी चर्चेद्वारे जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यकर्त्यांना संबोधतांना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की मुंबई येथील उमेदवारी संदर्भात झालेल्य राज्यस्तरीय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीबाबत शब्द देऊन प्रचाराला लागण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशावरून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आतापासून बुथनुसार कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक बुथ प्रमुख आणि सदस्यांनी जनसंपर्क वाढवून मतदारांशी अधिकाधिक संवाद साधणे आवश्यक आहे. आज आपण प्रचाराचा नारळ फोडला असून आजपासूनच प्रचाराचे कार्य अधिकृतरित्या सुरू झाले, असेही डॉ. लोढा म्हणाले.
ठिकठिकाणी घेणार आरोग्य शिबिर
येणा-या काही दिवसात याच प्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये बुथ प्रमुख व कमिटी सदस्यांचे मेळावे घेण्यात येणार असून. प्रत्येक बुथ मजबुतीकरणावर आमचा भर राहणार. तसेच कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार सर्कलमधल्या विविध गावात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. – डॉ. महेंद्र लोढा