बोर्डा येथे शेतक-यांचा चिखलातून वाट तुडवत प्रवास
आमदार व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे गावक-यांची तक्रार
विवेक तोटेवार, वणी: बोर्डा येथील शेतात जाणारा पांदण रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना चिखलातून व पाण्यातून वाट काढत शेतात जावे लागत आहे. याबाबत गावक-यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची अनेकदा भेट घेतली. पंचायत समिती सदस्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्यांना दरवेळी केवळ आश्वासनच मिळाले. शेवटी गावकऱ्यांनी कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडवण्याची विनंती केली आहे.
बोर्डा (कोरंबी-मारेगाव) येथून रासा, विरकुंड येथे जाणारा पांदण रस्ता हा अतिशय खराब झाला आहे. कागदोपत्री हा रस्ता 31 फुटांचा आहे तर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने हा रस्ता आता 8 फुटांचा झाला आहे. याबाबत येथून शेती करण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आमदारांच्या भेटी घेतल्या. पंचायत समिती सदस्या मंगला पावडे यांना याबाबत निवेदन दिले. त्यांनी मुरूम टाकून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता पावसाने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
या पांदण रस्त्यावरून जवळपास 70 ते 80 शेतकरी शेती करण्यासाठी जात असतात. अर्ध्या तासाचा प्रवास रस्ता खराब असल्याने दोन तास लागत आहे. शेतकऱ्यांना आपला माल घेऊन जाण्याकरिता रासामार्गे जावे लागते. हे अंतर जवळपास 12 किलोमीटर आहे. तर पांदण रस्त्यावरून गेल्यास हे अंतर 4 किलोमीटर आहे. लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने शेवटी बोर्डा वासीयांना जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोकावे लागले.
या रस्त्याबाबत सोमवार 19 जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. या समस्येकडे आता जिल्हाधिकारी लक्ष देतील का याकडे बोर्डा ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे. जर दुर्लक्ष केले तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे.
हे देखील वाचा: