विजेच्या खांबवरून महावितरण आणि बांधकाम विभागात जुंपली

कोट्यवधींच्या कामात पोलचा अडथळा, कामावरून एकमेकांची 'पोल'खोल

0

जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट रस्ता बांधकाम करताना अगदी रस्त्याच्या मध्यभागातून जाणारी विद्युत लाईन स्थलांतरित करण्यावरून सा. बां. विभाग व महावितरण या दोन्ही विभागात चांगलीच जुंपली आहे. महावितरण कार्यालयाने रस्त्यावर असलेले 8 वीज खांब व लाईन स्थलांतरित करण्यासाठी सा. बां. विभागाला तब्बल 67 लाख खर्चाचे इस्टीमेट दिले आहे. तर सा. बा. विभागाने अनाधिकृतपणे रस्त्यावर वीज खांब उभे केल्याचा आरोप महावितरण कंपनीवर करून पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली आहे.

प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वणी, कायर, पुरड या 45 कोटीच्या रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याच कामाचा भाग म्हणून चिखलगाव रेल्वे गेट ते साई मंदिर पर्यंत 5 कोटीच्या निधीतून डिव्हायडर व दोन्ही बाजूने ड्रेनेजसह 18 मीटर रुंदीचा सिमेंट रोडचे काम सुरू आहे. पुणे येथील मे.आर.के. इन्फ्रा.प्रा.लि. कंपनीतर्फे सदर काम करण्यात येत आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठे मोठे झाडे व विद्युत लाईन असल्यामुळे सदर काम मागील एका वर्षांपासून रखडले होते. वन विभागाच्या परवानगीनंतर झाडे काढण्यात आले. मात्र बांधकाम करताना रस्त्याच्या मधोमध येणारे विद्युत खांब हटविण्यासाठी बांधकाम विभाग व महावितरण कंपनी एकमेकाकडे बोट दाखवत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता याना पत्र लिहून विद्युत खांबमुळे काही अपघात घडल्यास महावितरण जवाबदार राहणार असल्याचे नमूद केले आहे. तर महावितरण अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरु असताना रस्ता बांधकाम करणे हा सा. बा. विभागाची चूक असल्याचे सांगितले आहे. एकूणच या दोन्ही विभागाच्या लढाईत कंत्राटदार हैराण झाला आहे.

अनधिकृतरित्या पोलची उभारणी: तुषार परळीकर
रस्त्याच्या दोन्ही बाजूने 15 मीटर पर्यंत जागा बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे. महावितरण कंपनीने बांधकाम विभागाकडून परवानगी न घेता अनधिकृतरित्या विद्युत पोल उभे केले आहे. त्यामुळे आता रस्ता रुंदीकरण करताना विद्युत लाईन स्थलांतरित करणे त्यांचे कर्तव्य आहे. उलट 8 खांबवरील लाईन स्थलांतरित करण्यासाठी 67 लाख रुपये भरणा करण्याचे पत्र त्यांनी दिले आहे. आम्ही रक्कम भरण्यास असमर्थ आहो.
– तुषार परळीकर, उप विभागीय अभियंता (PWD)

—————–

इलेक्ट्रिक लाईन 30-40 वर्षांपुर्वीची: फरकाडे
चिखलगाव रेल्वे गेट ते साई मंदिर पर्यंत विद्युत लाईन 30 ते 40 वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. तेव्हा सदर रस्ता हा सा. बा. विभागाच्या अधिनस्थ होता की ग्राम पंचायतीच्या मालकीचा होता, हे अद्याप स्पष्ट नाही. रस्त्याच्या बाजूला असलेले तब्बल 40 मोठे झाडे काढण्याचा खर्च बांधकाम विभागाने केला आहे. त्याचप्रमाणे विद्युत लाईन हटविण्यासाठीही त्यांनी निधीची तरतूद करावी. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रक प्रमाणे रक्कम भरणा केल्यास आम्ही वीज खांब व लाईन स्थलांतरित करु.
– ए. ए. फरकाडे, उप कार्यकारी अभियंता (महावितरण)

हे देखील वाचा:

पाहुण्यांना सोडून घरी परतणा-या इसमावर चाकू हल्ला

जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार

Leave A Reply

Your email address will not be published.