मारेगाव तहसीलमध्ये दलाल सक्रिय? सर्वसामान्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

झाडाखाली चालतो दलालांचा धंदा....!

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तहसील कार्यालयाला दलाल सक्रिय असल्याची सर्वत्र चर्चा असून यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची विनाकारण फरफट होताना दिसत आहे. मात्र स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देखील सर्वसामान्य करीत असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसताना दिसत आहे. या दलालांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करताना दिसत आहे.

तहसील कार्यालय, तालुक्यातील जनतेला नेहमी कामानिमित्त यावयाचे ठिकाण. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे काम वेळेत होतेच असे नाही. त्यामुळे अनेकजण एकाच कामासाठी या कार्यालयात वारंवार चकरा मारत राहतात. अशातच येथे येणाऱ्या नागरिकांची पुन्हा एका वेगळ्याच मार्गाने लूट होत असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे. तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे काम झाले नसल्यास आणि जे त्रस्त आहे अशा काही लोकांना हेरणारी काही मंडळी या कार्यालयात हजर असतात.

झाडाखाली चालतो धंदा….
ही दलाल मंडळी नेहमी सकाळी या कार्यालयात येऊन कार्यालयामधून ज्यांचे काम झाले नाही अशा ग्राहकांच्या शोधात असतात. ज्यांचे काम झाले नाही किंवा ज्यांना काम करायचे आहे अशा नागरिकांना हेरतात. तुमचे काम करून देतो म्हणत त्यांचेकडून रक्कम गोळा करतात. त्यांचे काम करून देण्याचा प्रयत्न करतात. या मंडळींचे तहसील कार्यालयात बसण्याचे एक विशिष्ट असे ठिकाण असून याच झाडाखाली त्यांचे आर्थिक व्यवहार चालत असतात.

याच्यावर कोणाचेही निर्बंध नसून यांना आळा घालण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. या दलालांना मोकळे रान तर दिले नाही ना अशी शंकाही येऊन जाते. या दलालांमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असून यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी नागरिक मागणी करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.