पुरुषोत्तम नवघरे, वणी: एखादी उत्तम स्थितीतली सेकंड हॅण्ड कार घेता येईल इतकी किंमत बैलांची असते. अगदी 40 हजारांपासून तर दीड लाख रूपयांपर्यंतचे बैल हे कायरच्या बैल बाजाराचे आकर्षण आहे. या बैल बाजारात अगदी तेलंगणापासूनचे (पूर्वीचे आंध्रप्रदेश) ग्राहक येतात. या बैलबाजाराची सुरुवात ब्रिटीशकाळात झाली. हा आठवडी भरणारा बैलबाजार त्याही पूर्वीचा असावा असा काही जणांचा अंदाज आहे.
वणीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले कायर गाव ब्रिटिशांच्या काळात तहसील होते. कारण कायर हे गाव ऐतिहासिक असून 40 ते 50 गावांचे केंद्र बिंदू होते. त्यामुळे कायर येथून गावाचा कारभार चालत होता. या गावाला पूर्वीपासूनच ऐतिहासिक महत्त्व आहे.
त्यामुळे ब्रिटिशांच्या काळापासूनच कायर येथील आठवडी बाजारात बैलांचा भव्य असा मोठा बाजार भरतो. आजही कायरच्या बाजारात मोठ्या प्रमाणात बैल येत असल्याने ही परंपरा कायम आहे.
कायरच्या बैल बाजारात परिसरातून विविध जातीच्या बैलजोड्या येऊन मोठ्या प्रमाणात बैलबाजार भरून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे कायरच्या बैलबाजाराची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. कायर हे ऐतिहासिक गाव असून येथे प्राचीन मंदिरे आहेत. येथे आजही भोसल्यांचा पुरातन किल्ला असून या किल्ल्याच्या समोरच बैलांचा भव्य बाजार भरतो.
परंतु यावर्षी कोरोना महामारीने थैमान घातल्याने मानवी जीवन उदध्वस्त केले. त्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन काढून कोविड 19 च्या नियमाचे पालन करण्याचे आदेश नागरिकांना दिले. त्यामुळे संपूर्ण व्यवहार पूर्ववत सुरू झाले. अशातच कायरचा ऐतिहासिक बैलबाजार मोठ्या प्रमाणात भरला.
या बैलबाजारामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराची भीती न बाळगता गावकरी दूरवरून कायर बाजारात आलेत. पांढरकवडा, मोठी उमरी, पाटण बोरी, झरी, मारेगाव, मुकुटबण, पठारपूर, वणी, नायगाव, परसोडा, बाबापूर, वडजापूर, चारगाव, घुग्गूस, वेळाबाई, शिरपूर, दरा, साखरा, नेरड, पुरड, चंद्रपूर, मूल, सिंधिवाढोना, या खेड्यापाड्यातून तसेच आंध्रप्रदेश राज्यातून बैल विक्रीसाठी आलेत.
या बैलबाजारात बैलांच्या खरेदी-विक्रीत लाखो रूपयांची उलाढाल झाली असल्याचे दिसून आले आहे. या बाजारपेठेत 400 ते 500 बैलजोड्या येतात. यामध्ये विविध जातीच्या बैलजोड्या येतात. जसे लांब शिंगांचे, जरशी, हरियाणा, पंढरपुरी व पटाच्या जोड्या तसेच शेतीला लागणाऱ्या बैलांची अदलाबदल होते. त्यामुळे या बाजारात बैलांची किंमत कमीतकमी 40 हजारांपासून तर लाख दीड लाखापर्यंत असते.
खरेदी विक्री होत असल्यामुळे कायर हे गाव बैलबाजारासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात परिसरातील शाळकरी लहान मुले, स्त्रिया, वयोवृद्ध नागरिक आठवडी बाजार करण्यासाठी तसेच शेतकरी व व्यापारी बैलांची खरेदी विक्री करण्यासाठी दर गुरुवारला आठवडी बाजारात येतात. बैल बाजार हे या गावाचे वैभव आहे. हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचा सहभाग असतो.
येथील सरपंच नितीन दखने व ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या पुढाकाराने बाहेरगाववरून येणाऱ्या जनावरांसाठी बाजारवाडीतील जागेची साफसफाई व त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु कोरोनाकाळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना महामारी रौद्ररूप धारण करण्याची शक्यता बळावली आहे.
पूर्वीपासून चालत आलेला ऐतिहासिक बैल बाजाराचे महत्त्व जोपासत बैल बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळण्यावर जोर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा