जितेंद्र कोठारी, वणी: केवायसी करायचे आहे, लॉटरी लागली, कॅशबॅक, एटीएम बंद झाले, इन्स्टन्ट लोन, क्रेडिट कार्ड देतो, सैनिक असून टिफिन पाहिजे अशी बतावणी करून फसवणूक करण्याची पद्धत आला जूनी झाली असून फसवणुकीचा एक नवीन फंडा आता उघडकीस आला आहे. गाडी कुरिअर करण्याच्या नावावर वणीतील एका विद्यार्थ्याला 5300 रुपयांनी ठकवले तसेच त्याची दीड लाखाची बुलेट गाडीही ठगांनी लंपास केली आहे. सौरव अशोक खामनकर (25) असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. पुण्याहून त्याने दुचाकी मुव्हर्स ऍन्ड पॅकर्स कंपनीमार्फत पाठवली होती. मात्र गाडी तर वणीला पोहोचलीच नाही उलट त्याच्याकडून कुरिअर चार्जेसच्या नावावर पैसे देखील उकळण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सौरव खामनकर हा तरुण वणीतील रहिवासी असून तो पुणे येथील डॉ. डि.वाय.पाटील कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे. सौरवकडे स्वत:ची बुलेट मोटरसायकल (MH29 AZ2016) आहे. ज्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे. कोरोनामुळे कॉलेजचे क्लास ऑनलाईन झाल्याने सौरवने काही दिवसांसाठी वणीला परत जाण्याचा निर्णय घेतला. ब-याच दिवसांसाठी गावी जायचे असल्याने त्याने बुलेट कुरिअरने पाठवण्याचे ठरवले.
दिनांक 01 जानेवारी रोजी सौरवने बुलेट कुरिअर करण्यासाठी मोबाईलवर काही कुरिअर सर्विस कंपनी सर्च केली असता त्याला पुण्यातीलच नॉर्दन कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्स या कंपनीचा मोबाईल नंबर मिळाला. त्या नंबरवर कॉल करून सौरवने विचारपूस केली असता कुरिअरसाठी 3 हजार रुपये खर्च येणार असल्याचे कंपनीच्या व्यक्तीने सांगितले. तसेच गाडी पोहोचल्यावर कुरिअर चार्ज द्यावा लागणार अशी सवलतही पुढील व्यक्तीने दिली. त्यावरून दोघांचा सौदा पक्का झाला.
1 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान नॉर्दन कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्सतर्फे रोहित चौधरी नावाचा युवक सौरव राहत असलेल्या रूमवर पोहचला. त्याने दोन तीन दिवसात गाडी वणीत मिळेल असे सांगून तो बुलेट घेऊन गेला. गाडी पॅकर्स ऍन्ड मुव्हर्सला दिल्यावर त्याच दिवशी सायंकाळी सौरव ट्रॅव्हलसने पुण्याहून वणीसाठी निघाला. 2 जानेवारी रोजी सायंकाळी सौरव वणी येथे पोहचला.
दुस-यांदा आर्थिक फसवणूक
सौरव वणीला पोहोचला तरी त्याची गाडी मात्र वणीत पोहोचली नाही. त्यामुळे त्याने पुणे येथील सदर कुरीयर कंपनीच्या कार्यालयात फोन करून विचारणा केली. त्यावर त्याला कुरीयर कंपनीकडून मोटरसायकल पाठविण्यासाठी विमा व इतर खर्च म्हणून 10 हजार रुपयाची मागणी केली. आधी 3 हजारात सौदा पक्का झाल्यानंतर 10 हजारांची मागणी केल्याने सौरवला धक्का बसला. याबाबत त्याने ग्राहक मंचात तक्रार करतो अशी धमकी दिली. तेव्हा कंपनीच्या व्यक्तीने तुम्हाला जिथे तक्रार करायची आहे ती करा असे सांगून फोन ठेवला.
काही दिवस वाटाघाटी होऊन शेवटी 5300 रुपये देण्याचे ठरले. समोरील व्यक्तीने फोन पेवर पैसे पाठवण्यासाठी 9024306168 हा नंबर दिला. सौरवने 15 जानेवारी रोजी 5300 रुपये फोन पे मार्फत ट्रान्सफर केले. पैसे पाठविल्यानंतर कुरीयर कंपनीच्या नंबरवर कॉल केला असता आज पाठवितो, उद्या पाठवितो अशी टाळाटाळ कंपनीच्या लोकांनी केली.
फसगत झाल्याचा संशय
गाडी पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याने सौरवने कंपनीच्या ऑफिसच्या पत्त्यावर मित्राला पाठवले असता सदर पत्ता खोटा असल्याचे आढळून आले. तसेच पंकजने ज्या क्रमांकावर फोन केला होता ते नंबरही बंद होते. ज्या क्रमांकावर त्याने पैसे ट्रान्सफर केले होते तो क्रमांक हरियाणा येथील कर्मवीर नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती त्याला मिळाली. गाडी कुरीयरच्या नावावर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौरव खामणकर तक्रार देण्यासाठी दिनांक 20 जानेवारी रोजी वणी पोलिस स्टेशन पोहचला. मात्र घटनास्थळ पुणे असल्यामुळे सौरवला वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवता आली नाही.
अनेक बोगस मुव्हर्स ऍन्ड पॅकर्स कंपनीची चलती
सध्या नेटवर अनेक पॅकर्स ऍन्ड मुव्हर्स कंपनी दाखवतात. त्यातील मोजक्याच कंपनी या ख-या आहेत. नामसाधर्म्य वापरूनही अनेक बोगस कंपनी अस्तित्वात आहे. त्यामुळे सामान कुरिअर करताना योग्य ती खात्री करून सर्विस बुक करणे गरजेचे आहे. सध्या दुचाकी पाठवण्याचा सर्वात सोयिस्कर आणि सुरक्षीत पर्याय हा ट्रेनचा आहे. याआधीही कुरिअरच्या नावाने तसेच ओएलएक्सवरून वस्तू विकण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे सामान कुरिअर करताना योग्य ती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा:
सावधान…! वणीतील एका हॉटेल व्यावसायिकास ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न
Comments are closed.