गर्भवती विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती, सासू-सास-यावर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात गोंडबुरांडा येथे दिनांक 20 मे ला 21 वर्षीय विवाहित महिलेने घरी फाशी घेत आपले जीवन संपविले होते. या आत्महत्या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दि. 24 मे ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती व सासु सास-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच प्रेमविवाह झालेल्या एका गर्भवती विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

गोंड बुरांडा येथील एका आदिवासी समाजातील एक मुलगी रिना हिचा सुनील मुसळे याच्याशी सन 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. तो आपल्या आईवडिलांसह आपल्या बुरांडा या गावी राहत होता. रिना आणि सुनील यांचा संसार सुखाने चालला होता. त्यातच ती संसारवेलीवर काही दिवसांनी फुलही उमलणार होते.

मात्र शनिवारी 20 मे रोजी रिनाने घरी कुणी नसल्याची संधी साधत राहत्या घरी छताला नायलॉन दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. प्रेमविवाह झालेल्या मुलीने अवघ्या काही महिन्यातच असे टोकाचे पाऊल उचलल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली होती. मुलीच्या आत्महत्येमागे तिचा पती सुनील मुसळे, सासरे भाऊराव मुसळे आणि सासू अंजना मुसळे हे तिघेही कारणीभूत आहे असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईने केला होता.

मृतक विवाहितेच्या आईने आपल्या मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यानेच तिने आत्महत्या केली अशा प्रकारची तक्रार दि. 24 मे ला सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून मारेगाव पोलिसांनी कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

रिनाच्या आत्महत्येने समाजमनाला चटका
रिना आणि सुनिलने समाजाचा विरोध झुगारून प्रेमाविवाह केला. संसाररूपी वेलीवर काही महिन्यातच एक फुल सुद्धा उमलणार होते. रीना ही चार महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना आणि शेतीच्या कामामध्ये घरच्यांना मदत करण्यात कुठेही मागे नसणा-या रिनाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने समाजमन सुन्न झाले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.