साईमंदिर ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत होणार 4 लेन सिमेंट रोड
आमदारांच्या प्रयत्नाने सीआरआयएफ अंतर्गत 25 कोटी मंजूर
जितेंद्र कोठारी, वणी : सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (सीआरआयएफ) अंतर्गत 2020-21 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात 2040.80 कोटी किंमतीचे 272 प्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यवतमाळ जिल्ह्याला झुकते माप देऊन जिल्ह्यातील 8 प्रकल्पांसाठी भरभक्कम 100 कोटीची निधी मंजूर केला आहे.
त्यातही वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी साई मंदिर चौक ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगपर्यंत डिव्हायडर व पथदीपांसह 4 लेन सिमेंट रस्त्याच्या कामांसाठी तब्बल 25 कोटींची निधी खेचून आणला आहे. वणी येथील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत दुभाजकसह सिमेंट काँक्रेट रस्त्याची नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती.
सीआरआयएफ अंतर्गत बांधकाम सुरु असलेले वणी कायर ते पुरड या कामात चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर चौक पर्यंत सिमेंट रस्त्याचे कार्य सुरु आहे. तर साई मंदिर चौक ते वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत 4 लेन सिमेंट रस्त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी 24 कोटी 58 लाख 58 हजार रुपयांची निधी मंजूर केला आहे.
सदर कामासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 17 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. निधी मंजूरीनंतर सदर कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा