दादासाहेब कन्नमवारांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी

भटके विमुक्त व बहूजन समाजातर्फे ईमेल आंदोलन,

0

जब्बार चीनी, वणी:  माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व बहुजन नायक मा. सा. कन्नमवार यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी. यासाठी महाराष्ट्रभर भटके विमुक्त व बहूजन समाजातर्फे सोमवारी (ता. २८) राज्यभरातून मुख्यमंत्री कार्यालयात ईमेल आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

हे आंदोलन कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती अंतर्गत करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा उल्लेख सामान्य प्रशासन विभागाने १५ डिसेंबर २०२० रोजी काढलेल्या शासन आदेशात करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१० जानेवारी ही जयंती व २४ नोव्हेंबर ही पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी, यासाठी भटके विमुक्त समाजातर्फे २००८ पासून लढा सुरू आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मारोतराव कन्नमवार यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी १९१८ मध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हातभार लावला.

महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. अनेक लढ्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे केंद्रात मंत्री म्हणून गेल्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून स्व. दादासाहेब उपाख्य मारोतराव कन्नमवार यांनी कार्यभार सांभाळला.

कर्मवीर मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांच्या सोबतीने मोठे योगदान आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले.

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तळमळीने कार्य करणारा लोकप्रतिनिधी, लोकाभिमुख मुख्यमंत्री, प्रामाणिक प्रतिमेचा धनी, पारदर्शक प्रशासक अशी बहुआयामी ओळख आपल्या कर्तृत्वाच्या बळावर दादासाहेब कन्नमवार यांनी निर्माण केली. पदावर असतानाच त्यांचा २४ नोव्हेंबर १९६३ ला मृत्यू झाला.

अशा थोर पुरुषाची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी. यासाठी सन २००८ पासून बेलदार समाज व भटक्या विमुक्तांच्या विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र याकडे राज्य सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.

प्रत्येक राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथीचे परिपत्रक शासनमार्फत दरवर्षी काढली जाते. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या थोर पुरुषाचा शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. शासकीय परिपत्रकात जयंती तथा पुण्यतिथी नोंद घेतल्यास सर्वसामान्यांना त्यांचा इतिहास माहित होऊ शकतो.

मात्र, शासन दखल घेत नसल्याची खंत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीने व्यक्त केली. शासकीय परिपत्रकात कन्नमवार यांचे नाव समाविष्ट व्हावे म्हणून कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीतर्फे सोमवारी (ता २८) राज्यभरातून ९६८ ईमेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, सामान्य प्रशासन मंत्री, मुख्य सचिवांना निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनात गजानन चंदावार, अरविंद गांगुलवार, प्रदीप बोनगिरवार, राकेश बुग्गेवार, हनमंतु रजनलवार, राकेश बरशेट्टीवार, अजय धोबे, प्रा. राम मुडे, विवेक ठाकरे, ज्योतिबा पोटे, रोहन आदेवार, प्रलय टीप्रमवार, मधुश्री चंदावार, डॉ. प्रांजल दुधेवार, करिश्मा चंदावार, अक्षय तोटावार, स्वप्नील आयतवार, अमन कुल्दीवार, सुनील बोनगिरवार, प्रणय बद्दमवार, सूरज गज्जलवार इतर समाजबांधवांनी सक्रिय सहभाग घेतला.

हेदेखील वाचा

एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

हेदेखील वाचा

ओबीसी मोर्चाला विविध समाजाचा वाढता पाठिंबा

Leave A Reply

Your email address will not be published.