तालुक्यात बेंबळाने केले शेतीचे नुकसान

शेतकऱ्यांची परवानगी न घेता केले शेतामध्ये काम

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण येथे बेंबळा प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांच्या शेतात टाक्याचे व पाईपलाईनचे काम केले. पावसामुळे आता त्या ठिकाणी पाणी साचून पीक सडत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतक-याने केली आहे.

चोपण येथील जगन जयवंत ताजने यांच्या शेत सर्व्हे नं. 21 मधील 1 हेक्टर 32 आर असलेल्या जमिनीवर बेंबळा प्रकल्प प्रशासनाने शेतमालकाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता टाक्याच्या कामास सुरुवात केली. ज्या वेळेस या टाक्याच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळेस शेतमालक जगन ताजने यांच्या मुलाचे निधन झाले होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांचे त्या काळात शेतामध्येही जाणे येणे कमी होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात हे काम झाले असल्याचा आऱोप शेतमालकाचा आहे.

बेंबळा प्रशासन काम करतात तेव्हा शेतमालकाची परवानगी घेतात. तसेच जेवढया भागामध्ये काम करायचे आहे तेवढ्या भागाची शेतीची विक्री सुद्धा केली जाते व या जागेचा शेतकऱ्यांना मोबदलासुद्धा दिला जातो. पण ताजने यांच्या शेतामध्ये काम करीत असताना ना त्यांची परवानगी घेतली ना शेतीची विक्री करून घेतली. तरीही यांच्या शेतामध्ये टाके बांधले, शेतीमधून पाईपलाईनचे काम सुद्धा केले.

सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत. तसेच टाक्याचे काम करतांना ते अर्धवटच करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा एखादा अपघात झाल्यास याची जबाबदारी कोणाची असाही प्रश्न विचारला जात आहे. शेतामध्ये काम करीत असताना ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वावर होता. त्यामुळे शेतामध्ये जाण्यायेण्याच्या रस्त्याचेही मोठे नुकसान झालेले आहेत. शेतामध्ये मुरुमाचे ढीग तसेच असून यामुळे शेतकऱ्याच्या जवळपास 10 आर जमिनीचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करते याची अनेकांना प्रतीक्षा आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांच्या परवानगीशिवाय काम कसे केले जाऊ शकते, असा प्रश्नही शेतकरी विचारात आहे. शेतीची विक्री न करता किंवा शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची सूचना न करता त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जगन ताजने यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

रंगारीपुरा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

Comments are closed.