मारेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, नदीकाठावरील शेत पुराखाली
मुसळधार पावसाने केले शेतातील उभ्या पिकांचे नुकसान
भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत बरसणाऱ्या या पावसामुळे वर्धा नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. यात शेतक-यांचे कपाशी व सोयाबिन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांनी केली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस सारखा पडत आहेत. यामुळे तालुक्यातून वाहणा-या वर्धा नदीला सध्या पूर आलेला आहे. वर्धा नदीला जोडणाऱ्या छोट्या मोठ्या नाल्यांनाही पूर आलेला आहे. नदीचे तसेच नाल्यांच्या पुराचे शेतामध्ये पाणी घुसले असून यात शेतीचे मोठे नुकसान होत आहेत. सततचा पडणारा पाऊस आणि त्यात शेतामध्ये शिरलेले पुराचे पाणी यामुळे कपाशी तसेच सोयाबीनची पिके पिवळी पडायला लागलेली आहेत.
तालुक्यातील चिंचमंडळ, दापोरा, खैरगाव, केगाव, चनोडा, गाडेगाव, शिवणी, दांडगाव, मुकटा, आपटी या नदीकाठावरील गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच नाल्याजवळील आणि सखल भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झालेले आहे. वर्धा नदीचे पाणी चिंचमंडळ येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसान झाले आहे.
यात अनुसया रोहिदास विखनकर, पांडुरंग मारोती दानव, सुनील राघोबाजी दानव, रवींद्र पुंडलिक दानव, शालीक मादीकुंडावर, बंडू गणपत पचारे, कमलेश नानाजी नान्हे, चंदा नानाजी नान्हे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून उभे पीक डोळ्यादेखत करपण्याच्या मार्गावर आहेत. अजूनपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिलेली नसून शेतकरी मदतीच्या अपेक्षेत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.