नागेश रायपुरे, मारेगाव: दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव ए.डी.वामन यांनी आरोपी दत्ता सुरेश लिंगरवार (30) रा. सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास एक वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा दी.3/10/2020 रोजी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी ही दि.10/12/2019 रोजी सांयकाळी 4 वाजताच्या सुमारास एकटीच बोटोणी येथील शेत शिवारात शेंगा,चण्याची भाजी व काड्या आणण्याकरिता गेली होती. शेंगा तोडून पाण्याची प्लास्टिक डबकी व काड्या घेऊन 4.30 वाजता खेकडवाई बोटोणी जाण्याऱ्या कच्च्या रस्त्याने घरी परत येत होती.
दरम्यान वखनोर यांच्या शेताजवळ अज्ञाताने मागून येऊन फिर्यादीस पकडून तोंडात रुमाल टाकून गळ्यातील मंगळसूत्र ज्यात सोन्याचे एक डोरले व 30 मणी (किंमत 10 हजार )जबरीने हिसकावून चोरुन नेले होते.
सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन मारेगावला दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 392 भा.द.वी अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पो. उपनिरीक्षक अमोल चौधरी यांनी केला. गुन्ह्यात आरोपीस अटक करुन त्याच्यापासून मुद्देमाल जप्त केला व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी व तपास अधिकारी यांच्यासह सात साक्षिदारांचे पुरावे नोंदविण्यात आलेत. साक्षिदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील पी .डी कपूर व कोर्ट पैरवी मपोका. संगीता दोरेवार यांनी काम पाहीले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)