विलास ताजने, मेंढोली: शासन, प्रशासन काही करत नाही हे महिलांच्या लक्षात आलं. त्या रणरागिणी झाल्या. आणि त्यांचा एल्गार यशस्वी झाला. कोलगाव (साखरा) खाण परिसरात अवैध दारू विक्री करताना महिलांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना दि. १८ शनिवारी दुपारच्या वेळी घडली. वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या कोलगाव (साखरा) येथील खाण परिसरात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. सदर दारूविक्रीमुळे होणाऱ्या त्रासाला ग्रामस्थ विशेषतः महिला वैतागल्या आहे. अनेकदा पोलिसांना सदर प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस महिला सरपंच गीता गणपत उपरे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी दोन दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडले.
सदर प्रकाराची माहिती भ्रमणध्वनी वरून शिरपूर पोलिसांना दिली. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी हरिदास गेडाम (३८), शेखर उरवते (४१) दोघेही रा. वणी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रतिबंध कायदा कलम ६५ इ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
अवैध दारू विक्रींविरुद्ध ठोस कारवाईची गरज
शिंदोला, शिरपूर, साखरा, कायर परिसरात अवैध दारूविक्री राजरोसपणे सुरू आहे. कमी श्रमात अधिक नफा मिळवून देणाऱ्या या धंद्यात लोकप्रतिनिधीचे पाठबळ असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे. एवढेच नव्हे तर खुद्द गाव पातळीवरील प्रतिष्ठित या व्यवसायात गुंतले आहे. कायर येथे तर पिंपरी रस्त्याच्या कडेला मांडव टाकून अवैध दारू विकी सुरू आहे. दर गुरुवारी बाजारात फेरफटका मारणाऱ्या पोलिसांना सदर बाब दृष्टीस पडत नाही का? गाव पातळींवर शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांना सदर प्रकार माहीत नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.
अवैध धंद्याविरुद्ध ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे पावले उचलणे अपेक्षित आहे. पोलिसांकडून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाया केल्या जात असल्या तरी अवैध दारूविक्री बंद झालेली दिसत नाही. संबंधित विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.