वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जादा दराने दारूची विक्री
सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तिन्ही तालुक्यातील बियरबार व देशी दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करून लाखो रुपये कमवीत आहे. वणी, मारेगाव,व झरी या तीन तालुक्यात दारू दुकान असोशियनने ही किंमत वाढवल्याची माहिती आहे. याकडे अबकारी विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे. देशी दारू दुकानात बाटलीची किंमत 52 रू. असून बहुतांश दुकानातून 55 ते 60 रुपये दराने विक्री करीत आहे. बियरबार व वाइन शॉपीमध्ये विदेशी दारू व बियर वर 20 ते 25 जास्त घेऊन जनतेची खुलेआम लूट करीत आहे. वणी विधानसभेतील तीन तालुके वणी,झरी व मारेगाव वगळता संपूर्ण जिल्ह्यात 20 ते 25 रुपये विदेशी दारूची किंमत कमी आहे. मग वणी विधानसभेतील वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यातील दुकानदारांना किंमत वाढवण्याची काय गरज? या दारू विक्रेत्यांवर लगाम कोण लावणार? तसेच संघटनेला किंमत वाढवण्याचा अधिकार कोणी दिला ? असा संतप्त प्रश्न जनता करीत आहे. बहुतांश बियरबार मध्ये शौचालय नाही. पार्किंग व इतर सुविधांचा अभाव आहे. सदर दारू विक्रेते जनतेला लुटत असल्याचे अबकारी विभागांना माहीत असून त्यांना कार्यवाही करता येत नाही का ते नियम तोडून दारू विक्री करीत आहे तसेच देशी दारू चिल्लर विक्रीचे दुकान असून ठोक विक्री करीत आहे आपल्या मर्जीने दारूचे रेट वाढवून विक्री करीत आहे. हा सर्व प्रकार नियमात बसत नसतानाही या दारू विक्रेत्यांवर का कार्यवाही होत नाही हे एक कोडेच आहे . या दारू विक्रेत्यांना अबकारी विभाग व पोलीस विभागाचे सहकार्य असल्याने जास्त दराने दारू विक्री व नियम मोडण्याचा प्रकार सूरु असल्याचे दिसत आहे. तरी अबकारी विभागाने विभागाने जातीने लक्ष देऊन जास्त दराने दारू विकीतून जनतेची होणारी लूट थांबवावी अशी मागणी जनता करीत आहे.