जीवाची बाजी लावून आगीपासून वाचविले पीक, मात्र गेला जीव
जितेंद्र कोठारी, वणी: शेतीत निघालेला कचरा जाळल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतक-याने जीवाचा आटापिटा करीत आग विझवली. मात्र या धावपळीत त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वणीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या उमरी या गावी शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी घडली. महादेव माथनकर असे मृत शेतक-याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की महादेव माथनकर (67) हे उमरी येथील रहिवासी होते. त्याची उमरी शेतशिवारात त्यांची शेती होती. त्यांनी शेतात गहू पेरला होता. त्याच्या मशागत करण्यासाठी ते अधिकाधिक वेळ शेतातच घालवायचे. शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी ते नेहमी प्रमाणे शेतात गेले होते. गव्हाची कापणी झाली असल्याने त्यांनी पीक कापून त्याचे शेतात ढीग लावले होते.
जीवाची बाजी लावून आगीशी झुंज
उन्हाळी पिकासाठी त्यांनी शेतीच्या कामाला सुरूवात केली होती. धु-यावर असलेला कचरा त्यांनी पेटवला होता. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ हळूहळू गव्हाच्या ढीगाकडे सरकत होते. मेहनतीने पिकविलेले पीक आगीत भस्मसात होण्याचे चिन्ह दिसताच महादेव यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेतातील पाण्याची मोटार चालू केली. शिवाय प्लास्टिक कॅनमध्ये पाणी भरुन भरुन त्यांनी आग आटोक्यात आणली.
पीक वाचले मात्र या धावपळीत महादेव यांना भोवळ आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळच्या सुमारास बैल घरी परतले. मात्र महादेव घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. तिथे त्यांना महादेव यांचा मृतदेह आढळला व शेतात आग लागल्याचे आढळून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आज शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर उमरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा:
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी प्रश्न पेटला, संतप्त महिलांची कार्यालयावर धडक
Comments are closed.