वणी: गणेशपूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं डोंगरगाव वासियांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुस-या दिवशी लोकप्रतिनिधींनी आठ दिवसात रस्त्याची दागडुजी आणि सहा महिन्यात रस्त्याचं मजबुतीकरण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं.
डोंगरगाव (दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसंच मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ताही पूर्णतः उखडला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहे. याविषयी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं अखेर डोंगरगाव, वेगाव येथील ग्रामस्थांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. आमरण उपोषणाचं हत्यार उपसताच प्रशासन दणाणलं आणि त्यांनी रस्त्याचं काम करून देण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणा-यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
डोंगरगांव येथील शंकरराव गोवारकर, गुलाब राजूरकर, मनोज झाडे, किशोर बांदूरकर, बापूजी लोणगाडगे, पांडूरंग मिलमिले, सुहास हिंगाणे, पंढरी येटी, विनोद रोगे तसंच किसान सभेचे दिलीप परचाके यांनी पुढाकार घेत प्रशासनाच्या विरूध्द एल्गार पुकारला होता. अखेर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांनी पुढाकार घेतला.
त्यांनी संबधीत विभागाला पाचारण करून गणेशपूर ते डोंगरगांव रस्त्याची आठ दिवसात तात्पूरती दुरूस्ती करण्याचं, तसंच सदर रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती अथवा खनिज विकासकडे पाठवून येत्या सहा महिण्यात रस्त्याचे मजबूतीकरण करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागं घेतलं. यावेळी आमदार बोदकुरवार, जि. प. सदस्य संघदीप भगत, जि.प. सदस्य बंडू चांदेकर, पं. स. सदस्या शिला कोडापे, रांगण्याचे सरपंच ज्योती शिंदे सह उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post