बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज चौपाटी परिसरात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी सलग कारवाई करून तिघांना जेरबंद केले. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 8 रुपयांहून अधिक रोकड व मटका साहित्य जप्त करण्यात आले. यातील पहिली कार्यवाही ही बुधवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी तर दुसरी कार्यवाही शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी करण्यात आली. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी पोलिसांनी दोनदा धाड टाकली. त्यावरून धाड टाकल्यानंतर लगेच दुस-या दिवशी पुन्हा मटका सुरु होत असल्याचे समोर आले आहे.
पहिली कारवाई, बुधवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पोलीस कॉन्टेबल हरीभाऊ दळवे यांची दीपक टॉकीज चौपाटी जवळ ड्युटी लागली होती. दरम्यान त्यांना चौपाटीवरील नगर पालिकेच्या कॉम्प्लेक्स जवळ मटका सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ छापा टाकला. या वेळी दोन आरोपी आकाश सुरेश मोहितकर (23) आणि संदीप पांढुरंग निखाडे (41, दोन्ही रा. रंगनाथ नगर, वणी) यांना ऑन स्पॉट पकडण्यात आले. त्यांच्या अंगझडतीतून 4920 रुपये रोख रक्कम, वरली मटका चिठ्ठ्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी गणेश विसर्जन दीपक चौपाटी जवळ पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी पोहेकाँ मारोती पाटील यांना आधीच्याच ठिकाणी पुन्हा मटका सुरु झाल्याचे आढळून आले. पाटील यांनी सहका-यांना सोबत घेत या भागात छापा टाकला. दरम्यान काही मटका बहाद्दर पळून जाण्यात यशस्वी झाले तर मटका चालक शंकर गणपत धंदरे (59, रा. रामपुरा वार्ड, वणी) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून 3220 रुपये रोख रक्कम, मटका बुक, कार्बन तुकडा व डॉटपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाया पंचासमक्ष पार पडल्या असून व्हिडिओग्राफी करण्यात आली. तिघांवरही महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 25 (अ) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
दोन्ही कारवाई ही एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या आदेशाने करण्यात आली. पोकॉ. हरीभाऊ दळवे, गजानन सावसाकडे, सुयोग महापुरे, नीलेश आडे, पोकॉ. डडमल, पोहेकॉ. मारोती पाटील, वसीम, पोकॉ. नंदकुमार, मिथून, गजानन यांनी ही कारवाई पार पाडली.
भुरट्या पत्रकारावर गुन्हा दाखल: सुहास हिंगाणे आत्महत्या प्रकरण



Comments are closed.