जितेंद्र कोठारी, वणी : सुरक्षा सप्ताह निमित्त कोळसा खाणीत कामाची पाहणी करीत असताना अधिकाऱ्याच्या बोलेरो वाहनावर डोझर मशीन धडकल्याने क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सह दोघं गंभीर जखमी झाले. वेकोलिच्या जूनाड ओपनकास्ट कोळसा खाणीत गुरुवार सायंकाळी 5 वाजता दरम्यान ही भीषण घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी चंद्रकांत वालदे व आंतरिक सुरक्षा प्रबंधक मनीष चावरे यांना उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार 9 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सुरक्षा सप्ताहनिमित्त जूनाड ओपनकास्ट कोळसा खाणीमध्ये कामाची पाहणी करण्यासाठी चंद्रकांत वालदे व मनीष चावरे हे दोन्ही अधिकारी शासकीय वाहनाने दौऱ्यावर होते. दरम्यान खाणीतून डोझर मशीन बाहेर नेत असताना डोझर ऑपरेटरचे नियंत्रण सुटले व शेकडो टन वजनाची डोझर मशीन मागे उभ्या असलेल्या बोलेरो वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात बोलेरो वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
बोलेरो वाहनात बसलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना बाहेर काढून भालर येथील वेकोलि दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने दोघांना तातडीने नागपूर पाठविण्यात आले. सुरक्षा सप्ताहाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या भीषण अपघातामुळे वेकोलीच्या कोळसा खाणींमध्ये सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. या दुर्घटनेनंतर वेकोलि अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.
Comments are closed.