डाॅ. संध्या पवार यांना जैताई मातृगौरव पुरस्कार जाहीर

मुकुटबनच्या लेकीचा सहा ऑक्टोबरला भव्य सन्मान

0 214

सुशील ओझा, झरी : दर वर्षी देवीच्या नवरात्रात दिला जाणारा विदर्भातील प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार या वर्षी मूळच्या मुकुटबन  येथील समाजसेविका डाॅ. संध्या पवार ( नागपूर ) यांना प्रदान करण्यात येईल असे जैताई देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व सचिव माधव सरपटवार ह्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रूपये रोख , स्मृतिचिन्ह , शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष आहे.

या पूर्वी हा पुरस्कार साधनाताई आमटे, सिंधुताई सपकाळ, डाॅ. राणी बंग, डाॅ.स्मिता कोल्हे, डाॅ.मंदाकिनी आमटे, डाॅ.सीमा साखरे, मेधा पाटकर, अॅड्. पारोमिता गोस्वामी यांना देण्यात आला. पुरस्कार रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात एका विशेष समारंभात दिला जाईल.

डाॅ. संध्या पवार यांनी आतापर्य॔ंत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील 33 मुलामुलींना स्वतःच्या कुटुंबात सामावून घेऊन त्यांना मातृप्रेम देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. दोनशेच्या वर शाळा , काॅलेजेसमधून व्यसनमुक्तीचे कार्य केले आहे. पालकमैत्री अभियानांतर्गत त्यांचे काम दखलपात्र आहे.

मुलींसाठी कराटे शिक्षणाचे व महिलांसाठी मार्गदर्शनपर अनेक शिबीरे घेतली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे दोन विषयात एम्. ए. व पी. एच. डी असूनही ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षिकाच राहणे स्वखुशीने पत्करले आहे.

त्यांनी तरूण भारत, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता इ.वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले असून नऊ पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. आता पर्य॔त त्या आठ मानाच्या पुरस्कारांच्या मानकरी आहेत. मूळच्या त्या झरी तालुक्यातील मुकूटबनच्या आहेत.

Comments
Loading...