हतबल वृद्धेच्या जगण्यावर फेरले पाणी
सरकारी नाली बुजवल्याने प्रवाह शेतात घुसला, पिकांचे नुकसान
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील वृद्ध विधवेच्या शेतात नालीचे पाणी जाऊन पिकांचे नुकसान होत असल्याने महिला त्रस्त झाली आहे. लीलाबाई उद्धव पाईलवार यांच्या गटक्रमांक ६४ मधील शासकीय नालीमध्ये गावातीलच विठ्ठल गणपत पाईलवार यांनी माती टाकून बुजविल्याने पारंपरिक पद्धतीने जाणारे पाणी शेतात येऊन पिकांचे नुकसान होत आहे. लीलाबाईला कोणतेही अपत्य नसून ती शेतीच्या भरवशावर जीवन जगत आहे. परंतु नालीचे पाणी शेतात जात असल्याने शेतीचे नुकसान होऊन मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तिचे जीवन जगणे कठीण झाले आहे.
शासकीय नालीत माती टाकून बुजवल्याची तक्रार सदर महिलेने तहसीलदार यांच्याकडे १३ मार्च ला केली. चौकशीची मागणी केली परंतु चौकशी ती न झाल्याने १० एप्रिलला पुन्हा तक्रार केली. तरी चौकशी झाली नाही म्हणून पुन्हा तिसरी तक्रार १६ मे रोजी करण्यात आली. तरीही चौकशी न झाल्याने अखेर ७ जूनला एस. डी. एम कार्यालय पांढरकवडा येथे तक्रार केली. तेव्हा ११ जूनला स्पॉट पंचनामा मंडळ अधिकारी येरावार यांनी केला. पंचनाम्यात विठ्ठल पाईलवार यांनी पाणी वाहून जाणाऱ्या शासकीय नालीत मुरूम टाकून पाणी अडविले व पूर्व पश्चिम असलेला बांध फोडून टाकल्यामुळे पूर्ण पाणी लिलाबाई पाईलवार यांच्या शेतात येऊन पिकाचे नुकसान होत असल्याचे पंचनाम्यात नमूद केले.
विठ्ठल पाईलवार यांना तीन दिवसांच्या आत सरकारी नाली खुली करून देण्याची नोटीस बजावण्यात आली. पंधरा दिवस लोटूनही नाली खुली करून दिली नसल्याने तहसीलदार यांनी सुद्धा तीन दिवसांत नाली खुली करून देण्याचे विठ्ठल पाईलवार यांना सांगितले. नाहीतर कारवाही करणार असेही सांगितले.परंतु विठ्ठल पाईलवार यांनी शेतातील कट्टा कुणालाही न विचारता फोडला. १५ ते २० ट्रॅक्टर माती नालीत टाकली. ज्यामुळे नाली बंद झाली आणि बांबूतून येणारे पाणी पूर्ण शेतात घुसले. शेताचे नुकसान झाले.
नियमाने शासकीय नाली बुजवता येत नसतानासुद्धा हेतुपुरस्सर नाली बुजवण्यात आली आहे. शासकीय नाली खुली करून दिल्याचे तहसीलदार यांना विठ्ठलाने खोटे सांगतिले. त्यामुळे एक जुलैला पुन्हा तक्रार केली. परंतु महसूल विभाकडून योग्य चौकशी होत नसून उलट तक्रारकर्तीलाच उद्धट वागणूक देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारकर्ती म्हातारी विधवा असून महसूल कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे व हलगर्जीपणामुळे तिच्यावर ही वेळ आल्याची तक्रारीत नमूद केले आहे. आठ दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना ३ ऑगस्टला देण्यात आलेल्या तक्रारीतून देण्यात आला.