कोरड्या ढगांकडे बघत दिवस काढतोय मारेगाव तालुक्यातील शेतकरी
पाण्याअभावी तालुक्यातील सोयाबिनचं पीक पूर्णपणे वाया
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात बहुतांश शेती कोरडवाहू आहे त्यामुळे शेतकऱ्याची भिस्त पावसाच्या पाण्यावरच आहे. पावसानं गेल्या एक महिण्यापासुन दडी मारलीये. परिणामी पाण्याअभावी शेतक-याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
यावर्षी हवामान खात्याने पंचान्नव टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्या अंदाजावर विश्वास ठेऊन पेरणी आटोपली, शासन जरी कृषीमालाला भाव देत नसली, तरी पाऊस चांगला झाला तर किमान त्याच्या शेतीचा खर्च तरी निघतो. पण गेल्या एक महिन्यापासुन तालुक्यात पावसाचा पत्ताच नाही. दुबार, तिबार पेरणी झाली. आधीच सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटात देखील सापडला आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील पिकांची पाहणी करुन कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.
तालुक्यात नवरगाव हे मध्यम प्रकल्पाचं धरण आहे. पावसाळा संपत आला असून हे धरण आता तळ गाठत आहे. त्यामुळे शेतक-यांची येणा-या रब्बी हंगामात शेतीला पाणी मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
(शेतक-यानं हेतुपुरस्सर मारलं दुस-याच्या शेतावर तणनाशक)
सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र ही कर्जमाफी पंधरा पाणी अर्जाच्या कचाट्यात सापडली आहे. प्रशासन स्तरावर अर्ज भरन्यासाठी कोणतीच पुरेशी व्यवस्था नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे सरकारनं शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.