रविवारी वणीत रंगणार भाजप आणि मनसेत विश्वचषकाचा फायनल सामना !

एकाच ठिकाणी दोन पक्षाद्वारे लाईव्ह मॅचचे आयोजन

निकेश जिलठे, वणी: रविवारी दु. 2 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. याची आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे याच वेळी वणीत दुसरी मॅच रंगताना दिसत आहे. ती मॅच म्हणजे भाजप विरुद्ध मनसे ! भाजपचे तारेंद्र बोर्डे व कुणाल चोरडिया यांनी एलईडी स्क्रीनद्वारा छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य एलईडी स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे जाहीर केले. तर मनसे नेते राजू उंबरकर यांनी देखील याच ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीनवर लाईव्ह मॅच दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. एकाच वेळी, एकाच ठिकाणी दोन राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आल्याने वणीकरांना राजकीय ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि मनसे यात विश्वचषकाच्या फायनल सामन्यात कोण षटकार मारणार? कोण आऊट होणार? कोण जिंकणार? की मॅच ड्रॉ होणार? याची चांगलीच उत्सुकता वणीकरांना लागली आहे.

बॅनर देखील जवळपास सारखेच !
विशेष म्हणजे दोन्ही बॅनरची साईज सेम आहे. इतकंच काय तर तांत्रिक भाषेत सांगायचं झाल्यास या दोन्ही बॅनरचे ईमेज रिझेल्युशन देखील सारखेच आहे. यातील कॉन्टेन्ट जवळपास सारखा आहे. भाजपच्या (तारेंद्र बोर्डे व कुणाल चोरडिया) बॅनरची हेडिंग ‘ऐतिहासिक क्षणाचे व्हा साक्षीदार’ अशी आहे. तर मनसेच्या बॅनरची हेडिंग ही ‘होवूया साक्षीदार ऐतिहासिक क्षणाचे’ अशी आहे. त्याखाली भाजपच्या बॅनरमध्ये ‘वर्ल्ड कप फायनल मॅच’ अशी सब हेडिंग आहे. तर मनसेच्या बॅनरमध्ये ‘विश्वचषक फायनल लाईव्ह मॅच पाहण्याची संधी !’ आहे. तर त्या खाली दोन्ही बॅनरमध्ये ‘मोठ्या एलईडी स्क्रीन द्वारे लाईव्ह मॅच दाखवण्यात येईल’ असे सेम आवाहन लिहिलेले आहे. विशेष म्हणजे दोन्ही बॅनर एकाच डिझारनरने तर नाही बनवले ? याची माहिती मिळू शकली नाही.

नवरात्रीत रंगला होता दांडिया…
गेल्या काही काळापासून वणीत मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी आणण्याची आणि भव्य दिव्य कार्यक्रम घेण्याची नेत्यांमध्ये होड लागलेली दिसून येत आहे. राजू उंबरकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आली होती. मनसेद्वारा गेल्या वर्षीपासून नवरात्रीत दांडिया उत्सव सुरू करण्यात आला. तर तारेंद्र बोर्डे यांनी कुणाल चोरडिया यांच्या सोबतीने नवरात्रीत दांडिया उत्सव घेतला. दोन्हीकडे आकर्षक बक्षिसांची होड लागली होती. मनसेमध्ये ईलेक्ट्रिक बाईक तर दुसरी कडे मोपेड प्रमुख बक्षिस होते. मात्र दोन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने ही कॉम्पिटिशन समोरासमोर नव्हती. त्यामुळे त्यावेळी याची विशेष अशी चर्चा झाली नव्हती.

गेल्या काही काळापासून राजू उंबरकर यांनी मतदार संघात चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यांनी कार्यक्रम, आंदोलन, भेटीगाठी याचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर तारेंद्र बोर्डे यांनी देखील कंबर कसली आहे. वणी शहराच्या पुढे जात विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम, उपक्रम, भेटीगाठी सुरू केल्या आहे. कुणाल चोरडिया हे विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. टी 10 लीग ही त्यांनी केलेली बीग बजेट क्रिकेट स्पर्धा चांगलीच रंगली होती.

दोन्ही पक्षाकडून वेळोवेळी विविध उपक्रम, कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जातात. मात्र यावेळी दोन वेगवेगळे पक्ष पहिल्यांदाच एका कार्यक्रमावरून समोरासमोर येताना दिसत आहे. आता या राजकीय मॅचमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता वणीकरांमध्ये ताणली गेली आहे.

Comments are closed.