जितेंद्र कोठारी, वणी: शहराच्या लगत असलेल्या निळापूर मार्गावरील वैभव कॉटेक्स या जिनिंग प्रेसिंगमध्ये अचानक आग लागून लाखो रूपये किमतीच्या मशीनचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत 10 ते 15 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार वैभव कॉटेक्स मध्ये ऑटोमॅटिक मशिनीद्वारे कापसावर प्रक्रिया केली जाते. रविवारी सकाळी 9.30 वाजता दरम्यान कन्व्हेयर बेल्टवर कापसामध्ये दगडाच्या तुकड्यामुळे घर्षण होऊन जिनिंग युनिटमध्ये आग लागली. जिनिंग युनिट मधून रुई प्रेसिंग युनिट पर्यंत पोहचून तिथेही आग लागली. जिनिंगमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान राखून जिनिंगमधील अग्नीरोधक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वेळीच जिनिंगमधील मुख्य वीजपुरवठा करणारी यंत्रणा बंद केली.
आगजनीच्या घटनेबाबत तात्काळ वणी पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. तसेच वणी नगर परिषदचे अग्निशामक वाहन मागविण्यात आले. अग्निशमन वाहनाने तब्बल 2 तासाच्या प्रयत्नानंतर जिनिंग मधील आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत मशिनरी, इलेक्ट्रिक वायरिंग, मोटर, सेन्सर व इतर साहित्य जळून खाक झाले होते.
सुदैवाने प्रेसिंग युनिटच्या काही अंतरावर ठेवून असलेली एक हजारच्या वर तयार कापूस गाठी व तब्बल 4 हजार क्विंटल कापूस या आगीतून थोडक्यात बचावले. वैभव कॉटेक्सचे संचालक स्वप्नील भंडारी यांच्या फिर्यादवरून वणी पोलिसांनी नुकसान पंचनामा केला.
हे देखील वाचा: