दुचाकीसह नाल्यात वाहून गेल्याने पवनारच्या इसमाचा मृत्यू

वणी -घोंसा मार्गावरील जामनी नाल्यावरील घटना

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पवनार येथील इसमाचा नाल्यातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. माहितीनुसार पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पवनार येथील शुद्धोधन कमल रंगारी(५२) आणि त्यांचा मित्र अमोल रामदास लेनगुरे हे दोघेही मिस्त्री काम करतात.

झरी येथून मिस्त्री काम आटोपून बुधवारी सायंकाळी सात वाजतादरम्यान भाजीपाला घेऊन घरी परत निघाले. सायंकाळी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी – घोंसा मार्गावरील जामनी नाल्यावरून पाणी वाहत होते. नाल्यावरून पाणी वाहत असताना काही लोकांनी नाला ओलांडून पाण्यातून दुचाकी बाहेर काढल्या.

परंतु शुद्धोधन हे नाला ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्पेंडर क्र एम.एच. ए एल ४२७५ घेऊन पाण्यात पडले. दुचाकीसह वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुचाकी नाल्यावरून २० ते ३० मीटर वाहून गेली. मृतक दीड किमी अंतरापर्यंत वाहून गेला. घटनेची माहिती गावात पसरली असता घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली.

रात्र झाल्याने अंधारात तसेच पाऊस सुरू असल्याने वाहून गेलेल्या शुदोधनला शोधण्यास अडचण निर्माण झाली. सकाळी घटनेची माहिती पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांनी पाटण पोलीस स्टेशनला दिली. यावरून ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे जमादार अभिमान आडे आणि संदीप सोयाम यांना घटनास्थळी पाठविले.

पोलीस घटनास्थळी पोहचून वाहून गेलेल्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू केली. अखेर दीड किमी अंतरावर तो झुडपात आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता झरी येथे पटविण्यात आला. मृतकाच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा असून सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.