धोत्रा जहांगिर येथे पंकजपाल महाराजांचे कीर्तन संपन्न

डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा करण्यात आला नागरी सत्कार

0

कारंजा: तालुक्यातील धोत्रा जहांगिर येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणेशोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकजपाल महाराजांनी ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, सामुहिक विवाह यावर लोकांचे प्रबोधन केले. यावेळी डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा सत्कार करण्यात आला.

संध्याकाळी ठिक सात वाजता सेवालाल महाराज मंदिर परिसरात कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंकजपाल महाराज म्हणाले की आपल्या देशात अंबानी आपल्या बायकोला वाढदिवसाला विमान भेट देतो. पण आपले गावाकडचे लोक बायकोसाठी साधा संडास बांधू शकत नाही अशी परिस्थिती आहे. विवाह प्रसंग कर्ज काढून लाखो रुपये खर्च केले जातात. सामूहिक विवाह करा, असा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला.

यावेळी डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचा सामाजिक व आरोग्य विषयक कार्याबाबत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की आज देश वाईट परिस्थितीतून जातोय. जाती धर्माचे विष माणसांमध्ये कालवले जात आहे. याची झळ आता गावांनाही बसत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेद्वारे आदर्श गावाची संकल्पना मांडली. ग्रामगितेचे आचरण आजच्या काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल राठोड यांनी केले तर आभार वसंत राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी धोत्रा जहांगीर येथील रहिवाशांसह परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!