पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू
पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, पाटाळ्याचा पूल अद्यापही बंदच.... भुरकी, शेलू गावातील सखल भागात शिरले पाणी
जितेंद्र कोठारी, वणी: अतीवृष्टी व पुरामुळे तालुक्यात तिस-यांना नदी काठावरील गावांना फटका बसला आहे. शेलू, भुरकी (रांगणा), कवडशी, सावंगी (नवीन) या गावाचा संपर्क अद्याप तुटलेला आहे. सतर्कता म्हणून यवतमाळ येथील 10 जणांचे शोध व बचाव पथक मंगळवारी रात्री तालुक्यात दाखल झाले आहे. शोध व बचाव पथकाने आज सकाळी 10 वाजता कवडशी गावातील 8 रुग्णांना बोटीद्वारे रेस्क्यू केले. पुरामुळे पाटाळ्याचा पूल सलग तिस-या दिवशीही बंदच आहे. मात्र सध्या पुलावरचे पाणी ओसरण्याला सुरूवात झाल्याची माहिती आहे.
गेल्या तीन महिन्यात काही दिवसांच्या अवकाशाने तीनदा तालुक्याला अतीवृष्टी व पुराने प्रभावित केले आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना याचा चांगलाच फटका बसला. शनिवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवार पर्यंत सुरू होता. मंगळवारी पाऊस थांबला. मात्र अतीवृष्टीमुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली परिणामी तालुक्यातील काही गावांना पुराने वेढा घातला आहे. सध्या तालुक्याच्या उत्तरेकडील शेलू (खु.) व भुरकी या गावांचा तर दक्षिणेकडील कवडशी व सावंगी (नवीन) या गावांचा संपर्क तुटला आहे. (पाहा व्हिडीओ… भुरकी येथील सखल भागात पुराचे पाणी)
शोध व बचाव पथक दाखल
दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराची भीषणता आधीचा दोनदा आलेल्या पुरापेक्षा कमी आहे. अद्याप गावात पाणी शिरले नसले तरी नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटल्याने या गावातील रहिवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने यवतमाळ येथून शोध व बचाव पथकाची मागणी केली होती. मंगळवारी रात्री 10 जणांची एक टीम तालुक्यात दाखल झाली आहे. या पथकाने आज सकाळी कवडशी या गावातील 8 रुग्णांना रेस्क्यू करत त्यांना बोटीद्वारे बाहेर काढले. यात वृद्ध तसेच चिमुकले व महिलांचा समावेश आहे. त्यांना वणी येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती आहे.
पाटाळ्याच्या पुलावरून पाणी ओसरण्यास सुरूवात
एकाच पावसाळ्यात सलग तीनदा पाटाळ्याचा पूल पाण्याखाली गेला. सोमवारी रात्रीपासून पाटाळ्याच्या पुलावरून पाणी वाहणे सुरू झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वरोरा व नागपूर येथे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. सध्या नदीचे पाणी ओसरायला सुरूवात झाली असली तरी अद्यापही पूल पाण्याखालीच आहे. त्यामुळे सध्या घुग्गुसमार्गे वरोरा व नागपूर येथे वाहतूक सुरू आहे. पाटाळ्याच्या पुलावरून वाहतूक सुरळीत होण्यास आज रात्री उशिरा किंवा उद्या (बुधवारी) सकाळ पर्यत वाट पाहावे लागणार आहे. (व्हिडीओ – आज सकाळी पाटाळ्याच्या पुलावरील परिस्थिती)
गावाचे पूनर्वसन करण्याची मागणी
वणी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पावसाळ्यात सलग तीनदा नदीला पूर आला आहे. सातत्याने पुराचा फटका बसत असल्याने भुरकी या गावातील नागरिकांनी गावाचे पूनर्वसन करावे अशी मागणी प्रसासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे. या वर्षी झोला, कोना, शेलू, भुरकी, कवडशी, सावंगी या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे. झोला, कोना, शेलू या गावातील रहिवाशांनीही गावाच्या पूनर्वसनाची आधीच मागणी केली आहे.
हे देखील वाचा:
स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध
Comments are closed.