सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या 17 वर्षीय अविनाश पवन लेनगुरे याच्यावर रात्री 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या मृत्यूमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकरी व लेनगुरे कुटुंबीयांनी जोपर्यंत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन ठोस आश्वासन देणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेबाबत पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना माहिती दिली. 11.30 वाजताच्या सुमारास आमदार पिवरडोल गावात पोहचले. दुसरीकडे गावक-यांनी ठोस आश्वासना शिवाय मृतदेह उचलण्यास नकार दिला. तर ठोस आश्वासनाचा अधिकार केवळ सीसीएफला असल्याचे वनविभागाच्या उपस्थित कर्मचा-यांनी सांगितले. त्यामुळे आमदार बोदकुरवार यांनी यवतमाळ येथील सीसीएफ व पांढरकवडा येथील डिएफओ यांना फोन करून घटनास्थळी बोलवले.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हे देखील घटनास्थळी पोहोचले. अखेर 6 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी, हल्ला करणा-या वाघाचा बंदोबस्त करणार, वाघाच्या नियंत्रणाकरीता ग्रामस्थांचा दलाची स्थापना, संवेदनशील भागात जंगलाच्या कडेला तारांचे कुंपण केले जाईल इत्यादी मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान हल्लेखोर वाघ संध्याकाळी पुन्हा घटनास्थळाकडे येताना दिसल्याने काही काळ धांदल उडाली होती. मात्र आरडाओरड करताच वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने पळून गेला.
अविनाशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह रात्री गावात पोहोचला. त्यानंतर रात्री 11 वाजता अविनाशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या नेतृत्वात पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंदे व मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हे देखील वाचा:
वणी बहुगुणी इम्पॅक्ट: मेंढोली-वरझडी मार्गाच्या दुरवस्थेची दखल
निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे