विवेक तोटेवार, वणी: वणीत एका दुकानातून गांजा विकणा-या इसमाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की वणीतील शास्त्रीनगरमध्ये सुनिल दादाजी नैताम (39) याचे समीक्षा नावाचे किराणा दुकान आहे. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना खब-याकडून किराणा दुकानात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी काल शुक्रवारी साडेपाच वाजताच्या दरम्यान पथकासह दुकानात धाड टाकली.
त्यावेळी सुनिल नैताम हा दुकानात हजर होता. दुकानात पोलिसांचे पथक पाहून त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी दुकानाची झडती घेतो म्हणताच असे इथे काहीच नाही तुम्हाला काहीतरी खोटी माहिती मिळाली अशी तो बतावणी करू लागला. मात्र झडती घेतल्यावर त्यांच्या दुकानात एका प्लास्टिकच्या पन्नीमध्ये 1 किलो 730 ग्रँम गांजा मिळाला. तसेच दुस-या एका पन्नीत 530 ग्रॅम वाळलेली गांजाची वनस्पती मिळाली.
पोलिसांनी एकूण 2 किलो 260 ग्रॅमचा माल जप्त केला आहे. तर आरोपी सुनिल नैतामला अटक करून त्याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व अमली पदार्थ अधिनियम 1985 (NDPS) च्या कलम 8 (क) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे, पोउपनि विजयमाला रिट्डे, डीबी पथकातील सुदर्शसन वानोले, प्रकाश गोरलेवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे, नितिन सलाम, संतोष आढाव, अमित पोयाम, दिपक वांड्रसवार, अजय शेंडे, वाहनचालक प्रशांत आडे यांनी केली.
वणीत शास्त्रीनगर परिसरात सध्या एका ठिकाणी कार्यवाही झाली असली तरी या भागात अनेक ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याची चर्चा आहे. यांच्यावर कधी कार्यवाही होणार असा प्रश्न वणीकर जनता उपस्थित करीत आहे. गांजा तस्करांची काही चैन आहे का तसेच या तस्करीत आणखी कोणकोण आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान वणी पोलिसांसमोर आहे.