वणीत एकाच रात्री 2 घरफोड्या… चोरट्यांचा धुमाकूळ झाला सुरू…

चोरटे झालेत हायटेक ? घटनास्थळी आढळले काही पुरावे.... पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर?

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीनंतर पुन्हा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आज सकाळी छ. शिवाजी चौकातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले. निखिल पवार व विद्या चौधरी असे घरफोडी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चोरटे अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करीत असल्याचे काही पुरावे पोलिसांना घटनास्थळावर आढळून आलेत. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या घरफोडीच्या एकाही प्रकरणाचा पोलिसांना छडा लावता न आल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार, निखिल पवार हे माहेर कापड केंद्र समोरील वार्डात राहतात. एका खासगी कंपनीत ते काम करतात. शनिवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दोन दिवस सुट्टी असल्याने ते बाहेरगावी गेले होते. त्यांच्याच घरासमोरच विद्या चौधरी या देखील राहतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्या त्यांच्या भावाला ओवाळण्यासाठी चंद्रपूर येथे गेल्या होत्या. घर बंद पाहून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडीचा प्लान आखला.

मध्यरात्री निखिल पवार यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांच्या घरातील आलमारी त्यांनी उघडली. मात्र आलमारीत त्यांना काही ऐवज सापडला नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा घरातील बेडकडे वळवला. बेडच्या आतील सर्व सामान काढून त्यांनी त्यात काही दागिने व रोख रकमेचा शोध घेतला मात्र त्यांना रोख रक्कम व दागिने आढळून आले नाही. त्यामुळे चोरटे तिथून निघून गेले. विशेष म्हणजे घरातील एका ठिकाणी काही रक्कम व दागिने ठेवलेले होते. मात्र चोरट्यांच्या ते शोधण्यात यश न आल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान होण्यापासून वाचले.

विद्या चौधरी या रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने भावाला ओवाळण्यासाठी चंद्रपूर येथे गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील एकही कानाकोपरा सोडला नाही. संपूर्ण घरातील सामान काढून चोरट्यांनी अस्त्यव्यस्त फेकले. दरम्यान वृत्त लिहेपर्यंत विद्या या वणीला पोहोचल्या नसल्याने नेकमी किती रकमेची चोरी झाली हे कळू शकले नाही. 

चोरटे झालेत हायटेक?
चोरी झालेला परिसर हा मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर आहे. या मार्गावर अनेक मोठे दुकाने आहेत. या व्यावसायिकांनी सुरक्षेसाठी त्यांच्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्हीत येणार नाही याची काळजी घेत चोरट्यांनी चादर पांघरून या परिसरात प्रवेश केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवाय घरफोडी झालेल्या एका घरी पोलिसांना 8 – 10 सीम आढळून आलेत. त्यामुळे हे चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी हायटेक पद्धतीचा तर वापर करीत नाही? असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

घर बंद… म्हणजे फुटलेच समजा…!
शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे हे चोर सोबत हत्यार घेऊन येत असल्याचे एका चोरीत आढळून आले. या घटनेत त्यांनी घरमालकाच्या डोक्यावर रॉडने जोरदार प्रहार केला होता. यात घरमालक थोडक्यात बचावले. अनेक दिवस त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू होता. जे घर बंद असते ते घर त्याच रात्री फुटलेले सकाळी आढळून येते. शिवाय यातील एकाही प्रकरणाचा छडा वणी पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे घरफोडीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. तर एकाही चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांना छडा लावता न आल्याने नागरिक दहशतीत तर आहेतच शिवाय हतबलही झाले आहेत.

हे देखील वाचा: 

वणीत मशाल रॅली, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह

 

Comments are closed.