पहिलं लग्न लपवून पोलीस महिलेची फसवणूक

बोगस विवाह मंडळात लग्न करून केलं लैंगिक शोषण

0

अमरावती: एका लखोबानं अविवाहित असल्याची बतावणी करून एका पोलीस महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिच्याशी लग्नाची करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे.

पीडित पोलीस महिला ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत आहे. तिचं आधी एक लग्न झालं असून तिनं पहिल्या पतीला घटस्फोट दिला आहे. घटस्फोट दिल्यानंतर ती तिच्या 13 वर्षांच्या मुलीला घेऊन वेगळी राहत होती. दरम्यान या महिलेची ओळख मंगेश माणिक शिरसाठ (२८) नामक तरूणाशी झाली. मंगेश हा जबलपूर येथे स्पेशल टास्क फोर्समध्ये कार्यरत असल्याचे महिलेला कळले. त्यानंतर दोघांचेही फोनवर बोलणे सुरू झाले.

मंगेश अमरावतीमधील विद्युत नगराजवळील अभियंता कॉलनीत राहत असल्यामुळे तो वारंवार महिला पोलिसाच्या घरी भेटायला यायचा. अविवाहित असल्याची बतावणी करून मंगेशने तिच्याशी खासगी विवाह मंडळात विवाह केला. मात्र, ते विवाह प्रमाणपत्र खोटे असल्याचे पीडितेला काही दिवसांनी समजले.

मंगेश हा वारंवार रजा घेऊन पीडितेला भेटायला यायचा आणि लैंगिक शोषण करायचा. जून २०१७ मध्ये मंगेश पीडितेच्या घरी आला असता त्याने पुन्हा तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले आणि तो विवाहित असल्याचे पीडितेला सांगितले. केवळ शारीरिक संबधांसाठी लग्न केल्याचे पीडितेला कळताच तिने मंगेशच्या घरी जाऊन शहानिशा केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबतची तक्रार तिने १० जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांकडे दिली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसून प्रकरण विधी अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.

महिलेच्या संमतीने संबंध प्रस्थापित झाले आहेत. केवळ तिची फसवणूक झाल्याचे या प्रकरणात निदर्शनास येत आहे. हे प्रकरण विधी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आले. अशी माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.