नात पळून गेल्याच्या धसक्याने आजीची विश प्राशन करून आत्महत्या
मारेगाव पोलीस स्टेशन समोर संतप्त नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
भास्कर राऊत, मारेगाव: अल्पवयीन नात एका तरुणासोबत पळून गेली. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या आजीने विश प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रविवारी मारेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 11 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी (16) एका मुलासोबत (21) पळून गेली. त्यामुळे मुलीच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शनिवारी आजीने तरुणाच्या आई वडिलांकडे जाऊन मुलीला परत आणण्याची विनंती केली.
मात्र तरुणाच्या आई वडिलांनी मुलीच्या आजीला तुमची नात काही घरी येऊ देणार नाही असे म्हणत तुझ्या नातीचे तुकडे करणार अशी धमकी दिली. त्यामुळे आधीच खचलेल्या आजीने घरी जाऊन उंदीर मारण्याची औषधी प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आजीला पांढरकवडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रविवारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या आजीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह मारेगाव पोलीस ठाण्यात आणला व मुलीला तात्काळ परत आणावे व धमकी देणा-या तरुणाच्या आईवडिलांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. ठिय्या आंदोलनामुळे मारेगावमध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अखेर पोलीस प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढली. तरुणाच्या आईवडिलांविरोधात भादंविच्या कलम 306 व 34 नुसार गुन्हा दाखल केला तसेच मुलीला तातडीने परत आणण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. संध्याकाळी उशिरा आजीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा:
पेंटर ठरला बुलेटचा मानकरी, कोणते खेळाडू ठरलेत बक्षिसांचे मानकरी ?
आमेर संघाचा T-10 चॅम्पियन्स लीगवर कब्जा… थरारक मॅचमध्ये मिळवला जन्नतवर विजय
Comments are closed.