ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरासह तालुक्याला गुरुवारी दुपारी गारपिटीने चांगलेच झोडपले. सुमारे 1 तास वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतक-यांच्या शेतातील गहू व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती मिळत आहे. तर अनेक ठिकाणी घराचे छत कोसळल्याने सर्वसामान्यांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. मात्र दुपारी चार वाजताच्या दरम्यान आकाशात अचानक काळे ढग दाटून आले. काही कळायच्या आतच अवकाळी पावसाला सुरवात झाली. थोड्याच वेळात जोरदार वादळी वार्यासह बोराइतक्या आकाराच्या गारा पडल्या. सुमारे एक तास सुरू असलेल्या या पावसात अर्धा ते पाऊन तास गारपीट सुरू होते.
अवकाळी आलेल्या पावसामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या वादळ व गारपिटाने नागरिकाची धांदल उडाली. तर वादळाने काही गावातील घरावरिल छप्पर उडाले.